कोतवाली पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
तक्रारी अर्ज जिल्हा उपनिबंधकांकडे वर्ग
अहमदनगर (प्रतिनिधी)- खासगी सावकारी प्रकरणातून वसुलीसाठी फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रकाश घनश्याम बठेजा यांच्या तक्रारीवरुन राजेश नारंग (रा. गुलमोहर रोड) यांच्यावर 20 सप्टेंबर रोजी अदखलपात्र गुन्ह्याची कोतवाली पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. नारंग यांना समजपत्र देऊन त्यांच्या विरोधातील तक्रार अर्ज जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे पुढील कारवाईसाठी वर्ग करण्यात आला आहे.
प्रकाश बठेजा यांनी दीड वर्षांपूर्वी राजेश नारंग यांच्याकडून 35 लाख रुपये तीन टक्क्याने व्याजाने घेतले होते. यामध्ये वेळोवेळी मुद्दल व व्याज जमा त्यांनी केली आहे. व्याजासह मुद्दलाची एकूण 23 लाख रुपये इतकी रक्कम देण्यात आली आहे. तसेच दोन लाख रुपयाचा चेक त्यांच्या पत्नीच्या नावाने दिला असून, त्यांनी ती रक्कम व्याजामध्ये वळवली आहे. राहिलेले 12 लाखाची नोटरी त्यांच्या मित्राच्या नावाने करुन दिलेली असल्याचे बठेजा यांनी निवेदनात म्हंटले आहे.
मध्यंतरी त्यांना व्याज देण्यास उशीर झाल्याने त्यांनी एका राजकीय कार्यकर्ता असलेल्या गुंडाला घरी पाठवून दमदाटी करुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर त्यांनी घरा समोर असलेली लहान भावाची चारचाकी गाडी देखील हिसकावून नेली असल्याचा आरोप बठेजा यांनी केला असून, या प्रकरणात खास्गी सावकारावर कारवाई होऊन न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.