अन्यथा प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाचे उपोषण
तहसीलदाराकडून आदेश होऊन देखील राजकीय दबावापोटी ग्रामपंचायतीकडून कारवाईस टाळाटाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- पाच महिन्यापासून बंद असलेला रस्ता खुला करुन देण्याचे तहसीलदाराकडून आदेश होऊन देखील खानापूर (ता. शेवगाव) ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याने भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या वतीने शहर जिल्हा उपाध्यक्षा शारदा अंतोन गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर रस्ता खुला करुन देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. अन्यथा प्रजासत्ताक दिनी गुरुवारी (26 जानेवारी) जिल्हाधिकारी कार्यालया समोर महिलांसह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
सरपंच, आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ता व त्याच्या साथीदारांनी खानापूर (ता. शेवगाव) येथील गायकवाड यांच्या हॉटेलची तोडफोड करुन जीवे मारण्याची धमकी देऊन जेसीबीच्या सहय्याने रस्ता बंद केला होता.
उपोषणानंतर याप्रकरणी दि.28 ऑगस्ट शेवगाव पोलीस स्टेशनला माजी सरपंच अण्णा शाहू जगधने, आजिनाथ अण्णा जगधने, रवी रामनाथ जगधने, राजू रामनाथ जगधने, काकासाहेब शाहू जगधने, एकनाथ दगडू जगधने, सोमनाथ रामनाथ जगधने व किसन चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र शारदा गायकवाड यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील सदरील रस्ता राजकीय दबावापोटी अद्यापि खुला करुन देण्यात आलेला नाही. हा रस्ता जेसीबीने मोठी चर खोदून, काटे टाकून व पत्रे लावून बंद करण्यात आलेला आहे. सदरील रस्ता खुला करण्यासाठी वेळोवेळी पोलीस व महसुल प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. याबाबत तहसिलदार यांनी ग्रामपंचायत स्तरावरुन कारवाई होण्याबाबत सूचना केल्या होत्या.
परंतु आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. पाच महिन्यापासून बंद असलेला रस्ता खुला करुन देण्याची मागणी भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या वतीने गायकवाड यांनी केली आहे.