काँग्रेसच्या नगरसेविका शिला दीप चव्हाण यांची मनपा आयुक्तांकडे मागणी
सावेडीला जागा आरक्षीत असताना जागा खरेदीचा खटाटोप मलिद्यासाठीच -शिला दीप चव्हाण
अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेत नुकतेच झालेल्या महासभेत सावेडी येथे स्मशानभूमी, दफनभूमी करण्याबाबत झालेला ठराव महासभेचा कोरम पूर्ण नसताना झाला आहे. तर या भागासाठी स्मशानभूमी, दफनभूमी करण्याबाबत यापूर्वी जागा आरक्षित केलेली असल्याचे स्पष्ट करुन सदर ठराव नामंजूर करण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेविका शिला दीप चव्हाण यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिकेत शुक्रवारी (दि.25 नोव्हेंबर) झालेल्या महासभेमध्ये सावेडी येथे स्मशानभूमी, दफनभूमी करण्याबाबतचा ठराव मंजूर झालेला आहे. सदर ठराव्याच्या वेळी महासभेचा कोरम पूर्ण झालेला नव्हता. अवघ्या 15 नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये सदरील विषयाबाबतचा ठराव मंजूर झालेला आहे. सावेडीला स्मशानभूमी, दफनभूमी करण्याबाबत यापूर्वी जागा आरक्षित केलेली आहे. आरक्षित जागेवर स्मशानभूमी, दफनभूमी न करता 32 कोटी रुपये संबंधितांना देऊन इतर जागेवर स्मशानभूमी, दफनभूमी उभारण्यात येत आहे. सावेडीला स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित असताना जागा खरेदीचा घाट घातला जात आहे. प्रस्तावामध्ये जागा खरेदीसाठी 32 कोटीचा नोंद नाही. सदरील खर्च कोणत्या लेखाशीर्ष मधून केला जाणार आहे. याचा बोध होत नसल्याचे नगरसेविका चव्हाण यांनी निवेदनात म्हंटले आहे.
हा ठराव आयुक्तांनी मंजूर करू नये, हा ठराव शासनाकडे महापालिका अधिनियम मधील कलम 451 नुसार विखंडित करण्यासाठी पाठवण्याची मागणी नगरसेविका शिला दीप चव्हाण यांनी आयुक्तांकडे केली आहे. हा ठराव मंजूर केला तर त्याबाबत नुकसानीची संपूर्ण जबाबदारी पिठासीन अधिकारी तथा महापौर सभेत असलेले नगरसेवक व प्रशासनावर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेकडे कर्मचार्यांचे पगार व शहरातील इतर विकास कामे करण्यास पैसे नसताना 32 कोटी कोठून आणले? हा संशोधनाचा भाग आहे. जिवंत माणसे खड्डेमय रस्त्यांची नरकयातना भोगत असताना, नागरिकांसाठी मरणानंतरच्या स्मशानभूमी, दफनभूमीची तयारी केली जात आहे. सावेडीला स्मशानभूमी, दफनभूमीसाठी जागा आरक्षीत असताना जागा खरेदीचा खटाटोप मलिद्यासाठीच सुरु आहे. -शिला दीप चव्हाण
