• Thu. Jan 22nd, 2026

कुष्ठधाम येथे गाडी अडवून युवकावर धारदार शस्त्राने हल्ला

ByMirror

Jul 11, 2023

मागील किरकोळ वादातून घडले भांडण, जखमी युवक जिल्हा रुग्णालयात दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील किरकोळ वादावरुन शुभम भगवान भालेराव या युवकाला कुष्ठधाम समोर अडवून धारदार शस्त्राने हल्ला करुन जखमी करुन, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मारहाण झालेल्या व्यक्तीच्या फिर्यादीवरुन राजेंद्र अण्णासाहेब नवगिरे (रा. भिस्तबाग चौक) यांच्यासह इतर तीन अनोळखी व्यक्तींवर तोफखाना पोलीस स्टेशनला सोमवारी (दि.10 जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी व राजेंद्र नवगिरे विळद येथील पाण्याच्या टाकीवर कामाला आहे. दोन दिवसापूर्वी भालेराव पगार आणण्यासाठी कंपनीच्या केडगाव येथील ऑफिसला गेले होते. तेथे नवगिरे याने भालेराव याला दारू पिण्यासाठी पैश्याची मागणी केली. पैसे न दिल्यास चोरीचा खोटा आरोप लावून कंपनीच्या साहेबांना सांगून तुला कामावरून काढून टाकण्यास धमकाविले. यावेळी दोघात किरकोळ वाद झाला होता.


रविवारी (दि.9 जुलै) भालेराव मोटरसायकल वरून कुष्ठधाम रोडने विळद येथे कामावर जात असताना कुष्ठधाम समोर, भिंगारदिवे मळा येथे राजेंद्र नवगिरे व इतर तीन अनोळखी इसमांनी त्यांना अडविले. नवगिरे यांनी डाव्या हातावर काहीतरी धारदार शस्त्राने हल्ला करून दुखापत केली. तर इतर तीन व्यक्तींनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. भालेराव यांच्या फिर्यादीवरुन संबंधितांवर भादवी कलम 324, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *