केडगावचे नगरसेवक ननावरे व कांबळे यांनी घेतली रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची भेट
रेल्वे ट्रॅकमुळे चार ते पाच कि.मी. चा वळसा घालण्याचा नागरिकांना मनस्ताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- कायनेटीक कंपनी समोरील रेल्वे ट्रॅकच्या खालून दौंड रस्त्यावर जाण्यासाठी अंडरपास करण्याची मागणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केडगाव येथील नागरिकांच्या वतीने नगरसेविका गौरी गणेश ननावरे व नगरसेवक राहुल कांबळे यांनी केली. नागरिकांना सदरील रेल्वे ट्रॅकमुळे चार ते पाच कि.मी. चा वळसा घालून जावे लागत असून, रेल्वे ट्रॅक ओलांडतांना अनेकांचा जीव जात असल्याचे रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या निदर्शान आणून देण्यात आले.
राज्यमंत्री दानवे गुरुवारी (दि.17 नोव्हेंबर) शहरात आले असता, केडगावच्या दोन्ही नगरसेवकांनी भेट घेऊन सदर प्रश्नी लक्ष वेधले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे, गणेश ननावरे आदी उपस्थित होते.
शास्त्रीनगर, केडगाव, नगर शहरातील नागरिकांना नगर-दौंड रस्त्यालगत असलेल्या कंपनीत जावे लागते. या कंपन्यातील बराचसा कामगार वर्ग दोन रस्त्याच्या पश्चिमेकडील समांतर रेल्वे ट्रॅकलगत मोहिनीनगर, येरंडवाडी व केडगाव देवी मंदिर परिसरात राहतात. या ट्रॅकच्या पश्चिमेकडील परिसरात जवळपास दोन हजार लहान मोठे घरे आहेत.
सदर रेल्वे ट्रॅक क्रॉस करणे करिता नगर-पुणे रस्त्यावरील उड्डाणपूलानंतर पाच किलोमीटर अंतरावर थेटर अरणगाव येथे अंडरपास आहे. केडगाव व परिसरातील लोकांना नगर शहर, बुरुडगाव, दौंड रस्ता इत्यादी ठिकाणी जाण्यास कमीत कमी चार ते पाच किलोमीटर रेल्वे ट्रॅकला वळसा घालून जावा लागते. यामुळे वेळ व इंधनरुपी खर्च वाचविण्यासाठी सतत जीव धोक्यात घालून, रेल्वे ट्रॅक वरुन ये जा करतात. असे करताना बर्याच लोकांनी आतापर्यंत जीव गमावलेला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जुना बुरुडगाव, केडगाव रस्ता या रेल्वे ट्रॅकने बाधित झालेला असून, तेथील रेल्वे ट्रॅक खालून अंडरपास होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. नगर शहराच्या मंजूर विकास आराखड्यात सदर रस्ता दर्शविलेला असून, तो अस्तित्वात आल्यास नगर-पुणे रस्त्यावरील रहदारीचा बराचसा ताण कमी होऊन अपघातही कमी होणार आहे. तर नागरिकांचा वेळ व इंधनरुपी पैसा वाचून त्रास कमी होणार आहे. यामुळे कायनेटीक कंपनी समोरील रेल्वे ट्रॅकच्या खालून दौंड रस्त्यावर जाण्यासाठी अंडरपास करण्याची मागणी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडे करण्यात आली आहे.