गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; तर प्रभात फेरीतून वंदे मातरम! चा गजर
अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जुने खारे (ता. नगर) येथील लोकहितवादी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवराम गंगाराम शेळके पाटील माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
माजी जिल्हा परिषद सदस्या माई पानसंबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अंकुश रावसाहेब शेळके, सचिव रावसाहेब पाटील शेळके, संस्थेचे संचालक मारुती गोरे, विठ्ठल दामोदर कावरे, विश्वनाथ सुखदेव लांडे, माजी विद्यार्थी व माजी सैनिक दीपक शेळके, रोहिदास लांडे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन मंजाबापू निमसे, सरपंच प्रभाकर मगर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कावरे, संजय बेकरसे, रामेश्वर निमसे, विद्यालायाचे मुख्याध्यापक ए.डी. थोरात, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक नरवडे आदींसह शालेय शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एसएससी बोर्डाच्या परीक्षेतील प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. माजी खासदार कै. दादापाटील शेळके यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना बक्षिस तर कै. गणपतराव पानसंबळ यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देण्यात आले. तर संस्थेचे अध्यक्ष अंकुश रावसाहेब शेळके यांनी देखील स्मृतीचिन्ह देवून विद्यार्थ्यांचा सन्मान केला. विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना लेदर फाईल देण्यात आल्या.
माई पानसंबळ म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपले भवितव्य घडवावे. माजी खासदार कै. दादापाटील शेळके यांनी शेतकरी, कष्टकरी वर्गातील मुले उच्च शिक्षित होण्याचे स्वप्न पाहिले होते. आज हे स्वप्न शाळेच्या माध्यमातून पूर्णत्वास जात आहे. अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन भवितव्य घडविले असल्याचे त्यांनी सांगितले.
अंकुश रावसाहेब शेळके म्हणाले की, जीवनात संघर्षाने यश मिळत असते. कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी जिद्द, मेहनत व सातत्य ठेवण्यची गरज आहे. एका दिवसात यश प्राप्ती होत नसते, त्यासाठी मोठी साधना उपयोगी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण प्रसंगी बॅण्ड पथकावर उत्कृष्ट संचलन करुन सलामी दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सशक्त भारताचा संदेश दिला. माजी सैनिक दीपक शेळके यांनी मुलांना मार्गदर्शन करुन देश सेवेत येण्याचे आवाहन केले. सकाळी गावातून विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रभात फेरीने सर्वांचे लक्ष वेधले. रॅलीतून भारत माता की जय.., वंदे मातरमचा विद्यार्थ्यांनी जयघोष केला.
