• Thu. Mar 13th, 2025

कचर्‍यात पडलेल्या व मदतीच्या आकांताने ओरडणार्‍या आजोबांना नवजीवन

ByMirror

Jun 30, 2023

मानवसेवा प्रकल्पाचे स्वयंसेवक मदतीला आले धावून

भूक भागविण्यासाठी कचर्‍यात असलेले अन्नपदार्थ खाण्यास तिथपर्यंत पोहोचल्याचा अंदाज

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या रेल्वे स्टेशन परिसरात एका कोपर्‍यात कचर्‍याच्या ढिगार्‍याजवळ पडलेल्या आजोबांना श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पाच्या स्वयंसेवकांनी नवजीवन दिले. मदतीच्या आकांताने ओरडणार्‍या त्या आजोबांना मदतीचा हात देऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. ही हृद्यद्रावक घटना बघून अनेकांचे डोळे पाणावले.


पोटात कणभरही अन्न नसलेल्या व अनेक दिवसांपासून एकाच जागेवर पडून असल्याने एका ज्येष्ठ नागरिकाच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. रेल्वे स्टेशन परिसरात साचलेल्या एका कोपर्‍यात कचर्‍याच्या ढिगार्‍याजवळून ते मदतीसाठी आकांताने ओरडत होते. या हाकेला अनेकांनी दुर्लक्ष केले, मात्र त्यांची हाक विजय फिरोदे यांनी ऐकली.आजोबांची अवस्था पाहून विजय यांचे डोळे पाणावले. काय करावे हे त्यांना सुचेना, परंतु आजोबांची अवस्था पाहून स्वस्थ्य देखील बसवत नव्हते. आजोबांच्या मदतीसाठी त्यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे दिलीप गुंजाळ यांना फोन केला. आजोबांच्या स्थितीविषयी माहिती दिली. दिलीप गुंजाळ यांनी याची दखल घेत त्यांनी संस्थेतील स्वयंसेवक राहुल साबळे, स्वप्नीन मधे यांना बेवारस निराधार जखमी वयोवृद्ध आजोबांच्या मदतीसाठी पाठवले.


स्वयंसेवक राहुल साबळे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. आजोबा ज्या कचर्‍याच्या ढिगार्‍याजवळ होते, तिथे मोठ्याप्रमाणात दुर्गंधी येत होती. पावसामुळे हा कचरा अधिकच कुजला होता. त्यामुळे दुर्गंधीचे प्रमाण मोठे होते. तिथे कोणीही जावू शकत नव्हते. मात्र अमृतवाहिनीच्या स्वयंसेवकांनी कशाचीही तमा न बाळगता आजोबांना त्या कचर्‍याच्या ढिगार्‍याशेजारून बाहेर काढले.


भूक भागविण्यासाठी कचर्‍याच्या ढिगार्‍यात पडलेले अन्नपदार्थ खाण्यासाठी आजोबा तिथपर्यंत पोहोचले असावेत आणि शारीरिक दुर्बलपणामुळे ते तिथेच पडून राहिले असावे, असा अंदाज अमृतवाहिनीच्या स्वयंसेवकांनी व्यक्त केला.संस्थेच्या स्वयंसेवकांनी आजोबांना बाहेर काढून तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आजोबा बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. आजोबांची ह्रद्याला वेदना देणारी परिस्थिती पाहिल्यावर जणू काही माणसातलं माणूसपण हरवत चाललंय, अशी प्रतिक्रिया अमृतवाहिनीच्या स्वयंसेवकांनी व्यक्त केली.


त्या आजोबांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचाराला ते प्रतिसाद देत आहेत. आजोबांच्या तब्यतीत सुधारणा होत असून, ते स्थिर असल्याची माहिती अमृतवाहिनीचे दिलीप गुंजाळ यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *