नागापूर भाजीपाला मटण मासे व्यापारी असोसिएशनचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
भाजी विक्रेत्यांना अडथळा आणण्यासाठी ट्रान्सपोर्ट चालक रस्त्यावर वाहने उभी करत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नगर-मनमाड महामार्गावरील सनफार्मा कंपनी जवळ रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांच्या व्यवसायाला व वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक रस्त्यावर अवजड वाहने उभी करणार्या ट्रान्सपोर्टच्या अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागापूर भाजीपाला मटण मासे व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन असोसिएशनचे अध्यक्ष अंतोन गायकवाड व भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा शारदा गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले.

शेतकर्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा व चांगल्या पध्दतीने ग्राहकांना भाजी-फळ खेरेदी करता यावे, या उद्देशाने नागापूर भाजीपाला मटण मासे व्यापारी असोसिएशनच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावरील सह्याद्री चौकात सनफार्मा कंपनी जवळील मोकळ्या जागेची जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छता करुन व मुरुम टाकून बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सह्याद्री चौकात रस्त्यावर आलेल्या भाजी विक्रेत्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी व बेशिस्तपणामुळे बाजाराचा सर्वसामान्यांना त्रास होत असल्याने या स्वतंत्र्य जागेची निवड करुन संघटनेच्या माध्यमातून भाजी विक्रेत्यांना बसण्याची व्यवस्था करुन देण्यात आली.
मात्र नवीन जागेत भाजी विक्रेते बसल्याने येथील एका खासगी ट्रान्सपोर्ट चालकाने भाजी विक्रेत्यांना हटविण्यासाठी दादागिरी सुरु करुन त्यांना धमकाविण्यास सुरुवात केली आहे. भाजी विक्रेते बसू नये म्हणून, त्याने त्यांच्या समोर भर रस्त्यावर अवजड वाहने उभी करुन वाहतुकीस व त्यांच्या व्यवसायाला अडथळा निर्माण केला आहे. वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याचे अपघात होऊन एखाद्या भाजी विक्रेत्याचा जीव जाण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जाणीवपूर्वक रस्त्यावर अवजड वाहने उभी करणार्या ट्रान्सपोर्टच्या अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागापूर भाजीपाला मटण मासे व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा गुरुवारी (दि.16 मार्च) पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
