सागर झरेकर खून प्रकरण
सात महिने युवक बेपत्ता झाल्यानंतर घातपात झाल्याचे आले होते उघडकीस
अहमदनगर (प्रतिनिधी)- एकतर्फी प्रेम प्रकरणातून खून करणार्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन दिला आहे. तब्बल सात महिने सागर झरेकर (वय, 25 वर्ष) हा युवक अचानक बेपत्ता होऊन त्याचा घातपात झाल्याचे उघडकीस आले होते.
घोसपुरी (ता. नगर) येथील मयत सागर झरेकर (वय, 25 वर्ष) हा अचानक बेपत्ता झाला होता. त्याबाबत जानेवारी 2022 मध्ये नगर तालुका पोलीस ठाण्यात सागर बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. सात महिने उलटूनही सागर परत आला नाही. त्यामुळे सागरच्या आई-वडीलांनी जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन सागर याचा शोध घेण्याची मागणी केली होती. त्याबाबत पोलीस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपास करण्याचा आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सागरच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला गौरव साके (रा. साकेवाडी) याने सागरचा घातपात केल्याची माहिती मिळाली, त्या आधारे गौरव साके याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता खून झाल्याचा उलगडा झाला.
सुशांत भापकर याने एकतर्फी प्रेमप्रकरणातून सागर याला दारु पाजून कुकडी कॅनलमध्ये वाहत्या पाण्यात फेकून दिल्याची कबूली आरोपींनी पोलीसांना दिल्यानंतर नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन भापकरला अटक करण्यात आली होती.

अटक आरोपी विश्वनाथ उर्फ सुशांत भापकर याने अॅड. सरिता एस. साबळे यांच्या मार्फत जिल्हा न्यायालय अहमदनगर येथे जामीन अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये अॅड. सरिता साबळे यांनी सागर झरेकर हा बेपत्ता झाल्यापासून गुन्हा दाखल होईपर्यंत सागर झरेकर यांच्या कुटूंबातील कुठल्याही सदस्याने आरोपी विरुद्ध संशय व्यक्त केला नव्हता किंवा कुठलाही गुन्हा दाखल केला नव्हता. आरोपी यास दारु ज्या ठिकाणी पाजली किंवा आरोपी यास कॅनलमध्ये फेकून देताना दरम्यान कुठलाही ठोस पुरावा नसल्याचा युक्तीवाद केला. तर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निवाडे देवून आरोपीविरुद्ध कुठलाही ठोस पुरावा नाही व तपास पुर्ण होत आल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सुशांत भापकर याला जामीन मंजूर केला.