नवनवीन शालेय दप्तराच्या भेटीने मुलांच्या चेहर्यावर फुलले समाधानाचे हास्य
अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्नती सेवाभावी संस्थेच्या वतीने भिंगार परिसराच्या विविध शाळेतील अडीचशे विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने मागील चार वर्षापासन इंकिफोर हेल्प या संस्थेच्या सहकार्याने मागील विविध शाळेतील गरजू, होतकरु विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी इंकिफोर हेल्प या जर्मन स्थित संस्थेचे भारतीय प्रतिनिधी संजय आढाव, विठ्ठल लांडगे, ज्योती आढाव, ज्ञानेश्वर हळगावकर, विठ्ठलराव लोखंडे, एबी डेव्हलपर्सचे किशोर उपरे, संस्थेचे अध्यक्ष दिलीप आस्मर, संचालक ज्ञानेश्वर फासे, संजय सपकाळ, गणेश उपरे, सचिव सागर कांबळे, ज्ञानेश्वर डिगे, शामभाऊ थोरात, पराग खुपसे, गजानन भंडारे, संगिताताई वरुडे, लीलावती आस्मर, आदिती कांबळे, शिवम भंडारी, आदिती कांबळे, ज्योती उदबत्ते, दिपक धकाते, राजू नागपुरे, तृप्ती कटोरे आदी उपस्थित होते.
या वर्षी व्हॉइथ कंपनी आणि मरीयान युस, थॉमस युस आणि लुईस युस यांनी दप्तरांचा सहयोग दिला आहे. भिंगार शहरातील कॅन्टोन्मेंट शाळा, वडार वाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि रयत शाळेतील अडीचशे विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले.
ज्ञानेश्वर हळगावकर यांनी गरजू घटकातील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देत असलेल्या प्रोत्साहनाबद्दल संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. विठ्ठलराव लोखंडे यांनी संस्था स्थापनेपासून संस्थेचे कार्यकर्ते तळागाळातील वंचितांसाठी सामाजिक उपक्रम राबवित असल्याचे स्पष्ट केले. संजय सपकाळ यांनी भावी पिढीचे भवितव्य घडविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. किशोर उपरे यांनी संस्थेला मदत करणार्यांचे दान सत्पात्री असल्याचे समाधान व्यक्त केले. विठ्ठल लांडगे यांनी उन्नती सेवाभावी संस्था प्रामाणिकपणे खर्या गरजवंतांना मदत करत आहे. महागाईच्या काळात गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे. ही मुले शिकली तर समाजाचे भवितव्य उज्वल ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवनवीन शालेय दप्तर मिळाल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर समाधानाचे हास्य फुलले होते. कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संचालक पराग खुपसे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्योती उदबत्ते यांनी केले. आभार संस्थचे अध्यक्ष दिलीप आस्मर यांनी मानले.