पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचा उपक्रम
नामांतराच्या पेटवलेल्या ज्योतचे मशाल मध्ये रूपांतर झाले -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उत्कर्ष फाऊंडेशनच्या वतीने होळकरशाहीचा धगधगता इतिहास मांडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती साजरी करण्यात आली. सावेडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अहिल्यादेवींचा पराक्रम, आदर्श राज्य कार्यपध्दती व धर्मरक्षणाच्या कार्याचा जागर करण्यात आला.

खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे व आमदार संग्रामभैया जगताप यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. येळकोट येळकोट, जय मल्हार… व अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो… च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, निखील वारे, संपत बारस्कर, अहील्याफेम अभिनेत्री करिश्मा आटोळे, धनगर संघर्ष समितीचे अनंत बनसोडे, फाऊंडेशनचे डॉ. अशोक भोजने, इंजि. डी आर शेंडगे साहेब, एन.ई. देशमुख, ज्ञानेश्वर भिसे, प्रा. बाळासाहेब शेंडगे, प्रा. भगवान गवते, नानासाहेब देशमुख, डॉ. राहुल पंडित, अॅड. सागर पादीर, डॉ. महेंद्र शिंदे, आर्किटेक चंद्रकांत तागड, राजेंद्र नजन, अॅड. सचिन भोजने, डॉ. योगेश विरकर, प्रा.एस.एस. वडीतके आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. अशोक भोजने यांनी सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्रित येऊन उत्कर्ष फाऊंडेशनची स्थापना केल्याचे सांगितले. दहा वर्षापासून फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु असून, दरवर्षी हा जयंती उत्सव साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच चौकात अहिल्यादेवींचा पुतळा व कमानीचा प्रश्न आमदार जगताप यांच्या प्रयत्नाने मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. तर निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीसं देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याचे नामांतर पुण्याशोक अहिल्यादेवी होळकर करण्याची घोषणा केली असताना, आमदार जगताप व खासदार महात्मे यांनी एकमेकांना पेढा भरवून स्वागत केले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सर्वांना एकत्र करुन अहिल्यादेवी होळकर यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे कार्य उत्कर्ष फाउंडेशनने केले. जिल्ह्यात सर्वात पहिले अहिल्यादेवी होळकरांचे नाव भिस्तबाग चौकाला देण्यात आले. या पेटवलेल्या ज्योतचे मशाल मध्ये रूपांतर झाले आणि जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी होळकर होत आहे. हा विचार लोकांच्या मनात पेरण्याचे काम फाउंडेशनने केले. अहिल्यादेवी होळकरांचे कार्य भविष्यातील हजारो वर्षे समाजाला दिशा देत राहणार आहे. तर त्यांचा पुतळा व स्मारकाच्या जागेसाठी कार्यवाही सुरु असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.
पद्मश्री डॉ. विकास महात्मे म्हणाले की, यापुढे नगरकर अभिमानाने अहिल्यानगर नाव सांगू शकणार आहे. सरकार नामांतराची मागणी पूर्ण करत आहे. आरक्षण मिळाले नाही, मात्र निराश न होता हा लढा सातत्याने पुढे चालविला जाणार आहे. शासनाच्या धनगर समाजासाठी असलेल्या शिक्षण, व्यवसाय, प्रशिक्षण, उद्योजकांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले. सुधीर मुनगंटीवार यांनी 1 हेक्टर जमिनीवर मेंढपाळांना चरण्यासाठी जमीन व तेथेच मुलांच्या शिक्षणाचा व राहण्याचे केलेले नियोजन भटकंतीचे जीवन जगणार्या धनगर समाजाच्या स्थैर्याची नांदी ठरणार असल्याचे सांगितले.
दिपाली बारस्कर म्हणाल्यी की, परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून महिलांनी घ्यावी. एवढी शतके ही व्यक्ती स्मरणात राहते, हे त्यांनी केलेल्या महान कार्यामुळे शक्य आहे. अहिल्यादेवींनी परिस्थितीवर मात करुन कणखरपणे त्या समाजात उभे राहून राज्य चालविल्याचे त्यांनी सांगितले. निखील वारे म्हणाले की, पुरुषप्रधान संस्कृतीत युद्धात पराक्रम गाजवून अहिल्यादेवींनी स्त्री कर्तृत्व सिद्ध केले. गोरगरिबांना न्याय, धर्माचे रक्षण व राज्याचा विकस करण्यासाठी केलेल्या कार्यातून दिसते. फक्त धर्मावर राजकारण करून चालणार नाही, तर राज्याच्या विकासाच्या दृष्टीने कार्य करण्याची प्रेरणा आजच्या सत्ताधार्यांनी त्यांच्याकडून घेणे अपेक्षित आहे.
धनगर संघर्ष समितीचे अनंत बनसोडे यांनी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये शासनाने अहिल्यादेवींची जयंती साजरी करुन दोन महिलांचा केलेला व मुख्यमंत्री यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवी होळकर करण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह असल्याचे सांगितले.

अभिनेत्री तथा व्याख्यात्या करिश्मा आटोळे यांनी होळकरशाहीचा धगधगता इतिहास मांडला. व्याख्यानात त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म ते रणभूमीतील पराक्रम, राज्यात आदर्श राज्याची नांदी व धर्मरक्षणावर प्रकाश टाकला. यावेळी समाजबांधवांसह महिला वर्ग डोक्यावर पिवळे फेटे बांधून मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्कर्ष फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.