या घटनेतून राज्य सरकारचा खरा चेहरा समोर आला – प्रा. अशोक डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा प्रस्थानाच्या वेळेला आळंदी (जि. पुणे) येथे वारकरींवर झालेल्या लाठीचार्जचा आम आदमी पार्टी अहमदनगर शहराच्या वतीने राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला आहे.

आळंदी येथे पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाप्रसंगी पोलीसांनी वारकर्यांवर लाठी चार्ज केल्याचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झालेला आहे. एकीकडे राज्य सरकार वारकरींना सुविधा देण्याच्या निव्वळ घोषणा करीत आहे. तर दुसरीकडे दिंडीतील वारकरींवर काठ्या उगारण्यात आले. ही घटना वारकरी सांप्रदायाचा अपमान करणारी असल्याचे स्पष्ट करुन आम आदमी पार्टीच्या पदाधिकार्यांनी शिंदे व फडणवीस सरकारचा जाहीर निषेध केला. सावेडी येथे झालेल्या निषेध सभाप्रसंगी शहर जिल्हा संघटक प्रा. अशोक डोंगरे, कार्याध्यक्ष भरत खाकाळ, राजेंद्र कर्डिले, संपत मोरे, गणेश मारवाडे, दिलीप घुले, प्रकाश फराटे, अॅड. विद्या शिंदे, क्षीरसागर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रा. अशोक डोंगरे म्हणाले की, पहिल्यांदाच तिर्थक्षेत्र आळंदी येथे पालखी प्रस्थान करत असताना वारकर्यांवर लाठी चार्जची घटना घडली आहे. वारकर्यांवर लाठी चार्ज करणे ही बाब अतिशय निंदनीय आहे. महाराष्ट्राला शांततेचा शिस्ततेचा संदेश देणार्या वारकर्यांवर कुठल्याही प्रकारचा विचार न करता लाठीने हल्ला करणे ही बाब मन हेलवून टाकणारी आहे. या घटनेतून राज्य सरकारचा खरा चेहरा समोर आला असल्याचे त्यांनी सांगितले.
