नवीन कामगार कायदे भांडवल धार्जिणे – कॉ. कारभारी उगले
अहमदनगर (प्रतिनिधी)- आयटक कामगार संघटनेचे 19 व्या जिल्हा अधिवेशन शहरातील बुरुडगाव रोड येथील भाकपच्या पक्ष कार्यालयात पार पडले. कॉ.कारभारी उगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनात भाकपचे राज्य सचिव अॅड.कॉ. सुभाष लांडे, जिल्हा सचिव अॅड.कॉ. बन्सी सातपुते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या अधिवेशनात जिल्हा सचिव अॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांनी मागील तीन वर्षाचा आढावा मांडून, आयटक व संघटनेला संलग्न युनियनच्या कामकाजाची माहिती दिली. आयटक संघटनेला संलग्न असलेल्या आशा कर्मचारी संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी, नगर शहर बिडी कामगार, संगमनेर अकोले बिडी कामगार, घरेलु मोलकरीण कामगार, पतसंस्था मधील कर्मचारी, अवतार मेहेर बाबा ट्रस्ट कर्मचारी, मोहट देवी कर्मचारी, लाल गिर बाबा ट्रस्ट कामगार, तलरेजा वाइन डीलर कामगार, पारनेर नगर पंचायत, मढी देवस्थान कामगार असे 10 हजार च्या आसपास सभासद असून त्यांचे प्रश्न आयटक माध्यमातून सोडविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, सेवा शर्ती या सर्व संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यात आल्या आहेत. किमान वेतन मिळवून देण्याचा लढा सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉ.कारभारी उगले यांनी आयटक संघटना ही 1920 साली स्थापन झालेली देशातील पहिली कामगार संघटना आहे. 31 ऑक्टोंबर 22 रोजी 102 वर्ष आयटकला झाले असून, या संघटनेचे ऐतिहासिक लढ्याची त्यांनी माहिती दिली. लाला लजपतराय हे या संघटनेचे पाहिले अध्यक्ष होते. अनेक कामगार कायदे आयटकने केलेल्या लढ्यामुळे निर्माण झाले व कामगारांना जीवन जगण्यासाठी संरक्षण मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिवेशनात पतसंस्था कर्मचारी याना सेवनियम लागू करणे, ग्रामपंचायत कर्मचारी याना चतुर्थ श्रेणी जिल्हा परिषद मधील असलेल्या कर्मचारी प्रमाणे वेतन दिले पाहिजे, बिडी कामगार याना रोज 300 रुपये मजुरी, तसेच ईपीएफ मध्ये सामील निवृत्त कर्मचारी याना दरमहा पेन्शन 3 हजार ते 5 हजार रुपये मिळावी.आशा व बीएफ याना अनुक्रमे 18 हजार व 21 हजार वेतन मिळावे, त्यांना मानधन नको तर वेतन द्या अशी मागणी आशा संघटनेचे जिल्हा संघटक कॉ. सुरेश पानसरे यांनी मागणी केली.
अवतार मेहेर ट्रस्ट अरणगाव मधील कर्मचारी याना किमान 21 हजार पगार व्हावा, तलरेजा वाइन डीलर फर्म मधील कर्मचारी यांना सेवा शर्ती लागू झाल्या पाहिजे. मोहटा देवी ट्रस्ट मधील नवीन कामगार याना कायम करून सेवाशर्ती लागू करणे. त्यासाठी कामगार न्यायालयात दाद ही मागितली असून प्रकरण प्रलंबित आहे. लाल गिर बुवा ट्रस्ट कर्मचारी याना भविष्य निर्वाह निधीची तक्रार करून लागू केला असून, त्यांना सेवाशर्ती लागू करण्याचे ठराव मांडण्यात आले.
भाकपच्या राज्य सेक्रेटरी पदी कॉ. लांडे, जिल्हा सेक्रेटरीपदी कॉ. सातपुते व बिडी कामगार फेडरेशनच्या राज्य अध्यक्षपदी कॉ. उगले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आयटकच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कॉ. कारभारी उगले म्हणाले की, कायदे बदलण्याचे षडयंत्र केंद्र सरकारने केले असून, हे सरकार व त्यांनी केलेले नवीन कामगार कायदे मालक, भांडवल धार्जिणे आहे. या विरोधात प्रखर लढा दिला जाणार असून, कामगार बाजूचे लढे उभारण्यासाठी भाकप कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. कॉ. बन्सी सातपुते यांनी कामगारांचे शेतकरी व कामगारांचे विविध प्रश्न मांडले. भारती न्यालपेल्ली यांनी कामगार वर्गावर होणारा अन्याय सहन केला जाणार असून, विडी कामागर या लढ्यात पूर्ण ताकतीने उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कॉ. सतीश पवार, विजय भोसले, कॉ. मारुती सावंत, रावसाहेब शेलार, विजय सोनवणे, संगीता कोंडा, सगुणा श्रीमल, राजेंद्र पळसकर, जयवंत बोरुडे, प्रदीप नारंग, कन्हैय्या बुंदेले, सुरेश दळवी, मनोज तलरेजा, कॉ.निवृत्ती दातिर, महेश खिस्ती उपस्थित होते. आयटकचे 19 वे राज्य अधिवेशन कोल्हापूर येथे 18 ,19 व 20 नोव्हेंबर रोजी होणार असून, यासाठी अहमदनगर मधून 37 प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे.