केरळला पार पडले राष्ट्रीय अधिवेशन
नवीन कामगार कायद्याविरोधात दिल्ली येथे संसदेवर देशव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णय
अहमदनगर (प्रतिनिधी)- आयटकच्या राष्ट्रीय अधिवेशनात कामगार नेते अॅड. कॉ. सुधीर टोकेकर व विडी कामगारांचे नेते कॉ. कारभारी उगले यांची राष्ट्रीय कौन्सिल सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. नुकतीच टोकेकर यांची आयटकच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली होती. यानंतर त्यांना राष्ट्रीय कौन्सिलमध्ये काम करण्याची संधी देण्यात आली आहे.

नुकतेच आयटकचे राष्ट्रीय अधिवेश केरळ मधील अलपूजा शहरात पार पडले. या अधिवेशनासाठी देशातील बाराशेपेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. तर यामध्ये 30 टक्के महिला प्रतिनिधींचा समावेश होता.
किमान वेतन पेन्शन योजना, ईपीएफ, नवीन पेन्शन योजना 1995 मध्ये वाढ करणे बाबत, असंघटित कामगारांचे प्रश्न, कोळसा खाणकामगार, रेल्वे कामगार, बँका, आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, कामगार यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. या वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी भविष्यातील धोरण ठरविण्यात आले.
अधिवेशनात प्रामुख्याने देशात लागू करण्यात आलेले नवीन कामगार कायदे रद्द होण्यासाठी जन आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन कामगार बिल फक्त मालक धार्जिणे असून, कामगारांना देशोधडीला लावणारे असल्याचा एकसूर उमटला.
या सर्व प्रश्नावर दिल्ली येथे संसदेवर देशव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. या अधिवेशनाला महाराष्ट्रातून 61 प्रतिनिधी हजर होते. आयटकची तीनशेच्या आसपास राष्ट्रीय कौन्सिल तयार करण्यात आली आहे. अॅड. टोकेकर व कॉ. उगले यांची निवड झाल्याबद्दल भाकपचे राज्य सेक्रेटरी अॅड. सुभाष लांडे, भाकपचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो, कॉ. सुकुमार दामले, आयटकचे राज्य सचिव श्याम काळे यांनी अभिनंदन केले आहे.