• Thu. Oct 16th, 2025

आयटकच्या राज्य उपाध्यक्षपदी नगरचे अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर

ByMirror

Nov 29, 2022

राज्यकारणी कौन्सिलमध्ये जिल्ह्यातील दहा पदाधिकार्‍यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- आयटकच्या 19 व्या अधिवेशनात नगरचे अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांची राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. कोल्हापूर येथे आयटकचे तीन दिवसीय अधिवेशन पार पडले. यामध्ये राज्य अध्यक्षपदी सी.एन. देशमुख, राज्य सेक्रेटरीपदी कॉ. श्याम काळे, राज्य उपाध्यक्षपदी अ‍ॅड. टोकेकर तसेच राज्य कार्यकारणी सदस्यपदी कॉ. सुरेश पानसरे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.

अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर

राज्याच्या कार्यकारणी कौन्सिलमध्ये जिल्ह्यातील दहा पदाधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 92 पदाधिकार्‍यांची त्रैवार्षिक कार्यकारणी निवडण्यात आली आहे. अनेक वर्षानंतर कामगारांची प्रमुख संघटना असलेल्या आयटकचे राज्य उपाध्यक्षपद नगरला मिळाले आहे.


अहमदनगर जिल्ह्यात अनेक कामगार संघटना असून, या कामगार संघटनांचे 8 हजार आयटकचे सभासद आहेत. आशा कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, घरेलू कामगार, लाल बावटा युनियन, विडी कामगार व पतसंस्था कर्मचारी आदी कामगार संघटनेत अ‍ॅड. टोकेकर कार्यरत असून, या संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या विविध प्रश्‍नांवर व त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांचा सातत्याने लढा सुरु आहे. त्यांच्या कामगार चळवळीतील कार्याची दखल घेऊन त्यांना आयटकच्या राज्य कार्यकारणीत काम करण्याची संधी देण्यात आली आहे.


आयटकच्या राज्यकारणी कौन्सिलमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कॉ. कारभारी उगले (अकोले), कॉ. सुरेश पानसरे (राहाता), कॉ. निवृत्ती दातीर (अकोले), कॉ. संजय नांगरे (शेवगाव), कॉ. मारुती सावंत (पाथर्डी), कॉ. सतीश पवार (अरणगाव, ता. नगर), कॉ. जयश्री गुरव (राहाता), कॉ. वर्षा चव्हाण (श्रीगोंदा), कॉ. उषा अडांगळे (अकोले), कॉ. भारती न्यालपेल्ली (नगर शहर) यांची नियुक्ती झाली आहे.


नूतन पदाधिकार्‍यांचे आयटक राष्ट्रीय सचिव सुकुमार दामले, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. भालचंद्र कानगो, भाकपचे राज्य सचिव अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे, आयटकचे सचिव कॉ. राजू देसले, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. बन्सी सातपुते, ग्रामपंचायत महासंघाचे अध्यक्ष कॉ. तानाजी ठोंबरे, राज्य सचिव कॉ. नामदेव चव्हाण आदींसह भाकपच्या पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *