• Fri. Mar 14th, 2025

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत हृदयरोग तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Mar 12, 2023

माणसाला माणूस म्हणून जगविण्याचे आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य -महापौर रोहिणीताई शेंडगे

अहमदनगर (प्रतिनिधी)- माणसाला माणूस म्हणून जगविण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल करत आहे. संतांच्या आशिर्वाद व त्यांच्या विचाराने मानवसेवेचे कार्य हॉस्पिटलमध्ये घडत असून, त्यांच्या मानवरुपी ईश्‍वरसेवेला महापालिकेच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे आश्‍वासन महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी दिली.


जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 31 व्या स्मृतिदिनानिमित्त रमेश दिपक बोथरा (ताराचंद हासराज बोथरा) परिवाराच्या वतीने आयोजित मोफत हृदयरोग तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी महापौर शेंडगे बोलत होत्या. यावेळी महापालिका स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, युवासेनेचे विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, पारुनाथ ढोकळे, शरद कोके, कुसुमबाई बोथरा, दीपक बोथरा, ज्योती बोथरा, अमृता बोथरा, रमेश बोथरा, अनिता बोथरा, संतोष बोथरा, बाबूशेठ लोढा, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, डॉ. वसंत कटारिया, वसंत चोपडा, सुभाष मुनोत, डॉ. अमित थोपटे, डॉ. पियुष मराठे, डॉ. विनय छल्लाणी आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. वसंत कटारिया म्हणाले की, वीस वर्षापूर्वी तीन ते पाच लाख रुपये खर्च असलेल्या बायपास सर्जरी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अवघ्या पन्नास हजार मध्ये करण्याची संकल्पना रुजविण्यात आली. अल्पदरात सर्वोत्तम व दर्जेदार आरोग्यसेवा दिली जात असल्याचे हॉस्पिटल देशभरात नावरुपाला आले. महिन्याला 60 ते 70 बायपास सर्जरी यशस्वी होत असून, आजपर्यंत 50 हजार पेक्षा जास्त बायपास सर्जरी यशस्वी झाल्या आहेत. ग्रामीण भागात वाडी-वस्तीवर जाऊन रुग्णसेवा देण्याचे काम हॉस्पिटलच्या माध्यमातून केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


संतोष बोथरा म्हणाले की, माणूस गेल्यावर त्यांनी केलेले सामाजिक कार्य व विचार जिवंत राहतात. शिवसेनेचे उपनेते स्व. अनिल राठोड यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलसाठी नेहमी सहकार्य केले. रुग्णसेवेच्या या कार्यात त्यांचे सदैव योगदान राहिले आहे. संतांच्या आशीर्वादाने त्यांनी समाजसेवेचे व्रत अंगीकारून काम केल्याने त्याचे आजही शहरात नाव घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अभिषेक कळमकर व बाळासाहेब बोराटे यांनी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरु असलेल्या रुग्णसेवेच्या कार्याचे कौतुक केले.
भगवान फुलसौंदर म्हणाले की, जगा आणि जगू द्या!, हे आनंदऋषीची महाराजांचे विचार घेऊन हॉस्पिटलचे कार्य सुरु आहे. माणसात देव पाहून रुग्णसेवेचे कार्य सुरू आहे. जे इतरांसाठी जगतात तेच अजरामर होतात. याच विचारधारेने शहरात स्व. अनिल राठोड यांच्या प्रेरणेने समाजसेवेचा वसा शिवसेना पुढे चालवत असल्याचे सांगितले. संभाजी कदम यांनी धकाधकीच्या जीवनात मैदाने ओस पडली असून, हॉस्पिटल भरली आहे. समाज आरोग्यदायी करण्यासाठी व्यायामाकडे वळण्याची गरज असल्याचे सांगितले. तर आनंदऋषीजी हॉस्पिटलचा बहरलेला वटवृक्ष सर्वांना आरोग्याची सावली देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


गणेश कवडे म्हणाले की, आनंदऋषीजी महाराजांच्या कृपेने हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवा सुरू आहे. तळागाळातील लोकांना याचा लाभ मिळत आहे. नगर-कल्याण रोडला उभे राहत असलेल्या आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या दुसर्‍य प्रकल्पाला सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दीपक बोथरा यांनी मानवसेवेच्या कार्यात बोथरा परिवाराचे नेहमीच योगदान राहिले आहे. या सेवेत सामावून घेण्याचे भाग्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. सर्व उपस्थितांनी आपल्या भाषणात शिवसेनेचे उपनेते स्व. अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस उजाळा दिला. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.
या शिबीरात 223 रुग्णांची मोफत हृदय तपासणी करण्यात आली. गरजेनुसार रुग्णांची बायपास सर्जरी, हृदयातील झडप बदलणे, हृदयातील छिद्र बुजविणे, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राही अल्पदरात केल्या जाणार आहेत. तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत केल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *