शिबिराला उत्सफूर्त प्रतिसाद
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या निस्वार्थ रुग्णसेवेतून अनेकांना नवजीवन -प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- संतांच्या आशिर्वाद व त्यांच्या विचाराने मानवसेवेचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये घडत आहे. या निस्वार्थ रुग्णसेवेतून अनेकांना नवजीवन मिळत असून, सेवाभावाने उभे राहिलेल्या या आरोग्य मंदिरातून प्रचंड मोठी सेवा सुरु आहे. सेवेतूनच हॉस्पिटलने सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला असल्याचे प्रतिपादन स्नेहालयाचे संस्थापक प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त श्रीमती रिमलबाई शांतीलाल कटारिया स्मृतीप्रित्यर्थ डॉ. वसंत बाबालाल, संजय एवं कटारिया परिवाराच्या वतीने आयोजित हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी कुलकर्णी बोलत होते. यावेळी संजय गुगळे, राजूशेठ शेटिया, डॉ. वसंत कटारिया, बाबालाल कटारिया, संजय कटारिया, डॉ. अनिकेत कटारिया, लता कटारिया, डॉ. प्रज्ञा कटारिया, कार्डिओलॉजिस्ट डॉ. राहुल अग्रवाल, डॉ. अमित थोपटे, डॉ. स्वप्निल कर्णिक, डॉ. राहुल एरंडे, डॉ. विनय छल्लाणी, डॉ. गजेंद्र गिरी, डॉ. प्राजक्त पारधे, मानकशेठ कटारिया, डॉ. आशिष भंडारी, संतोष बोथरा, सुभाष मुनोत आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या पायाभरणीत कटारिया परिवारचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. संपूर्ण कुटुंब समर्पित भावनेने या सेवाकार्यात देत असलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, वीस वर्षापूर्वी तीन ते पाच लाख रुपये खर्च असलेल्या बायपास सर्जरी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अवघ्या पन्नास हजार मध्ये करण्याची संकल्पना रुजविण्यात आली. अल्पदरात सर्वोत्तम व दर्जेदार आरोग्यसेवा दिली जात असल्याचे हॉस्पिटल देशभरात नावरुपाला आले. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर समाजाकडून घेऊन समाजाला समर्पित करणारी ही रुग्णसेवा आहे. महिन्याला 60 ते 70 बायपास सर्जरी यशस्वी होत असून, आजपर्यंत 50 हजार पेक्षा जास्त बायपास सर्जरी यशस्वी झाल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये अद्यावत कार्डियाक विभाग उभारण्यासाठी कटारिया परिवाराचे मोलाचे योगदान लाभले असून, त्यांची दुसरी पिढी कार्डिओलॉजीस्ट डॉ. अनिकेत कटारिया या मानवसेवेच्या कार्यात रुजू होत असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय गुगळे म्हणाले की, मोठा दवाखाना, अद्यावत मशनरी यापेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे सेवाभावाने कार्य करणारे अनुभवी तज्ञ डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांची टीम रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करून रुग्णसेवेतून समाधान केले जात आहे. आरोग्य सेवा ही गरजूंसाठी काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून समाजाची सुरु असलेली सेवा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्डिओलॉजिस्ट डॉ. राहुल अग्रवाल म्हणाले की, हॉस्पिटलच्या कार्डियाक विभागात लहान मुलांपासून वयोवृध्दां पर्यंतच्या हृदयाच्या सर्व शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या जात आहे. यासाठी अद्यावत मशनरी उपलब्ध करून उच्च दर्जाची सेवा दिली जात आहे. जीवनदायी योजनेचा माध्यमातून ही सेवा मोफत दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ. वसंत कटारिया म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या कार्यात अल्पदरात सेवा देत असताना उत्तम दर्जा कायम ठेवण्यात आला आहे. हॉस्पिटल मधील कॅथलॅब आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट कॅथलॅब म्हणून नावरुपास आली आहे. नवीन सॉफ्टवेअर व अद्यावत मशनरीवर कोट्यावधी रुपयांचा खर्च करुन रुग्णांना अल्पदरात सेवा पुरविली जात आहे. सेवा कार्याच्या या यज्ञात समर्पित भावनेने संपूर्ण कुटुंबीयांचे योगदान दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या शिबीरात 102 रुग्णांची मोफत हृदय तपासणी करण्यात आली. गरजेनुसार रुग्णांची बायपास सर्जरी, हृदयातील झडप बदलणे, हृदयातील छिद्र बुजविणे, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी अल्पदरात केल्या जाणार आहेत. तर महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. आशिष भंडारी यांनी मानले.