बाबासाहेबांचा वैचारिक वारसा पुढे चालविल्यास बाबासाहेबांना खरे अभिवादन -संदीप (नाना) कापडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

तर संघटनेच्या कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष संदीप (नाना) कापडे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळे, महिला सेल अध्यक्षा सविता हराळ, जनसंपर्क अधिकारी संतोष वाघ आदी उपस्थित होते.
जिल्हा अध्यक्ष संदीप (नाना) कापडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्व व विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्यास समाजाचा खरा विकास साधला जाणार आहे. त्यांच्या विचाराने शेवटच्या घटकांना दिशा मिळणार असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविल्यास बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. दीपक कांबळे यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देणारे डॉ. बाबासाहेबांचे विचार आजही सर्व समाजाला दिशादर्शक आहे. महापुरुषांच्या विचारांनी व प्रेरणेने बदल घडणार असून, त्यांची मार्गदर्शक तत्त्वे मानवतेच्या उध्दारासाठीच असल्याचे त्यांनी सांगितले.