• Wed. Nov 5th, 2025

अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

ByMirror

Mar 1, 2023

चक्क अवतरले बालवैज्ञानिक

विज्ञान प्रदर्शनातून पर्यावरणाच्या प्रश्‍नांवर विविध प्रकल्पांचे सादरीकरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. चंद्रशेखर रामन, बिरबल साहनी, एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा आदी भारतीय वैज्ञानिकांच्या वेशभुषेत अवतरलेल्या बालवैज्ञानिकांनी सर्वांची लक्ष वेधली.


राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेत भरविण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन बायोटेक्नॉलॉजी विषयाचे प्राध्यापक संजय मोहरीकर यांच्या हस्ते झाले. संस्थेचे विश्‍वस्त अ‍ॅड. गौरव मिरीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.


प्रारंभी भारताचे थोर वैज्ञानिक चंद्रशेखर रामन यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत गीताने विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय अफसर शेख यांनी केला. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिकाला चालना देण्यासाठी चंद्रशेखर रामन यांच्या जीवनपटावर आधारित चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात पर्यावरण संवर्धन, जल शुध्दीकरण, पाणी बचत, सौर ऊर्जेचा वापर आदी विविध विषयावर प्रकल्प मांडण्यात आले होते.


प्राध्यापक संजय मोहरीकर म्हणाले की, जग विज्ञानाच्या लहान-मोठ्या गोष्टींनी भरलेले आहे. घरापासून ते दररोजच्या दैनंदिन जीवनात विज्ञानाशी निगडीत अनेक साहित्याचा समावेश होत असतो. विद्यार्थ्यांनी निरीक्षण क्षमता उत्तम ठेवल्यास वैज्ञानिक दृष्टीकोनाला चालना मिळून बालकांमध्ये दडलेला वैज्ञानिक घडणार असल्याचे सांगितले.


प्राचार्य प्रभाकर भाबड म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांमधून भविष्यात एखादा वैज्ञानिक घडणार आहे. यासाठी शालेय जीवनातच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याची गरज आहे. या बालवैज्ञानिकांकडूनच भारत देशाला दुसरे नोबेल पारितोषिक मिळवून देण्याची अपेक्षा आहे. ही जबाबदारी भावी पिढी नक्कीच स्वीकारुन आपली वाटचाल करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


संस्थेचे विश्‍वस्त अ‍ॅड. गौरव मिरीकर यांनी विज्ञानातील नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली कल्पनाशक्ती जागरुक ठेऊन, निरीक्षण करण्याची गरज आहे. निरीक्षणातून वैज्ञानिक दृष्टीकोनाला चालना मिळत असल्याचे सांगून, वैज्ञानिक म्हणून विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी त्यांना उपस्थितांना प्रोत्साहित केले. तर संस्थेचे प्रमुख कार्यवाहक छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाहगौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या यादव यांनी केले. आभार स्वाती भालेराव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *