15 हजार रुपये वेतन मिळण्याची कामगारांची मागणी
योग्य कामगार हिताच्या मागण्यांचा डिमांड नोटीसमध्ये समावेश -अॅड. कॉ. सुधीर टोकेकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनची बैठक अरणगाव (ता. नगर) येथील अवतार मेहेरबाबा केंद्र येथे पार पडली. यामध्ये ट्रस्टशी नवीन करार करण्यासंदर्भात देण्यात येणारी डिमांड नोटीसवर चर्चा करुन सर्वानुमते कामगारांना 15 हजार रुपये वेतन मिळण्याची मागणी करण्यात आली. तर डिमांडमध्ये समाविष्ट करण्यात येणार्या विविध मागण्यांवर चर्चा झाली.
लाल बावटेचे सचिव अॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकप्रसंगी युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, खजिनदार प्रभावती सदस्य पाचारणे, सुनिल दळवी, अनिल फसले, सुभाष शिंदे, राधाकिसन कांबळे, सुनीता जावळे आदींसह युनियनचे सदस्य असलेले कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या कराराची मुदत 31 मार्च 2023 मध्ये संपत असून, नवीन करारासाठी लवकरच ट्रस्टशी चर्चा करुन त्यांना डिमांड नोटीस देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व कामगारांची भावना जाणून घेण्यात आली. यामध्ये कामगारांनी विविध मुद्दे व प्रश्नावर चर्चा केली.
युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार म्हणाले की, मागील काही वर्षात कामगारांच्या एकजुटीने करार होऊन कामगारांना हक्काच्या मागण्या मान्य करता आल्या. महागाईच्या काळात कामगारांचा उदरनिर्वाह चालण्यासाठी 15 हजार रुपये वेतन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. कॉ. सुधीर टोकेकर म्हणाले की, हा करार ट्रस्ट व संघटनेच्या समन्वयातून करण्याचा प्रयत्न राहणार आहे. मागील करार करताना मोठा संघर्ष करावा लागला. या करारामध्ये ट्रस्टशी योग्य कामगार हिताच्या न्याय मागण्या केल्या जाणार आहेत. कामगार कायद्याप्रमाणे सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी युनियन प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.
प्रारंभी अवतार मेहेरबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन बैठकीला सुरुवात करण्यात आली. या बैठकीत पगार एवढा कामगारांना बोनस मिळावा, मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक खर्च वाढवावा, मेडिक्लेमचा शंभर टक्के खर्च संस्थेने भरावा, कामगारांना नियुक्तीपत्र देण्यासह विविध पंचवीस ते सव्वीस मागण्यांचा डिमांड नोटीसमध्ये समावेश करण्यात आला आहे. या मागण्यांबाबत सर्व कामगारांनी सहमती दर्शवली असून, लवकरच ही नोटीस ट्रस्टला सादर करुन नवीन करार केला जाणार आहे.