नगर-कल्याण रोड परिसरात जलसेवा उपक्रमाचा लोकार्पण
नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी युवा सेनेचे शहराध्यक्ष महेश लोंढे यांचा पुढाकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या नगर-कल्याण रोड परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात अधिक गंभीर होत असताना मनपा अधिकार्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या, निवेदन दिले, आंदोलन केले, अधिकार्यांशी चर्चाही झाली. परंतु पाण्याची समस्या काही सुटत नसल्याने युवा सेनेचे शहराध्यक्ष महेश लोंढे यांनी पुढाकार घेतला आणि नागरिकांसाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी स्वखर्चाने एक स्वतंत्र टँकरच उभा केला आहे.
स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागविण्याच्या जलसेवा उपक्रमाचे लोकार्पण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे व माजी नगरसेवक पै. संभाजी लोंढे यांच्या हस्ते झाले. यावेळी पै. रामभाऊ लोंढे, पै. श्याम लोंढे, ज्ञानेश्वर ठाणगे, महेश लोंढे, ओमकार लेंडकर, आकाश सोनवणे, ओमरत्न भिंगारदिवे, राजेंद्र शिंगवी, महेश दिवेकर, चंद्रकांत निंबाळकर, सचिन ठाणगे, शुभम काकडे, सचिन ठाणगे, गणेश रोहोकले, पप्पू घोडके, ओम खंडागळे, गोपी साळवे, राकेश शिंदे, ऋषीकेश घोडके, आकाश अष्टेकर आदी उपस्थित होते.

नगर-कल्याण रोड येथील प्रभाग क्रमांक 8 मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे. नळाद्वारे पाणी येत नाही, दहा ते बारा दिवसाला एक टँकर येत असल्याने उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याच्या गंभीर प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नावर महापालिका प्रशासन व पाणी पुरवठा विभागाला वेळोवेळी तक्रारी करुनही हा प्रश्न सुटलेला नाही. या परिसरातील अघोषित पाणीबाणी सुरू असल्याने युवा सेनेचे शहराध्यक्ष महेश लोंढे यांनी हा ज्वलंत प्रश्न लक्षात घेऊन या भागातील नागरिकांना पाणी मिळण्यासाठी स्वतंत्र टँकरच स्वखर्चाने उभा केला आहे. या टँकरद्वारे स्वखर्चाने नागरिकांना उन्हाळ्यात पाणी देण्यात येणार असून, टँकरचा डिझेल व ड्रायव्हरचा खर्च त्यांनी स्वत: उचलला आहे. ही जलसेवा तातडीने कार्यान्वीत करण्यात आली आहे. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करून तहान भागविल्याबद्दल लोंढे यांचे आभार मानले.
अनिल शिंदे म्हणाले की, पाण्याची टंचाई भागविण्यासाठी घेतलेला जलसेवेचा उपक्रम प्रेरणादायी आहे. पाणी प्रश्नावर राजकारण न करता, लोकांच्या प्रश्नाची जाणीव ठेऊन ते सोडविण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
महेश लोंढे म्हणाले की, उन्हाळ्यात नगर-कल्याण रोड परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. त्यांना पाण्यासाठी इतर स्त्रोत नाही. महापालिका हद्दीतील शहराच्या रहिवासी भागात पाण्यासारखा मूलभूत प्रश्न अजूनही सुटला नसल्याची खंत आहे. पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता, हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परिसरातील गरजवंतांना मोफत टँकर उपलब्ध केला जाणार असून, या सुविधेच्या माध्यमातून येथील रहिवाशांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर प्रश्नही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
