वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी लायन्स क्लब शिक्षणदूतची भूमिका -धनंजय भंडारे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना 15 सायकली भेट देण्यात आल्या. लायन्सच्या माध्यमातून गरजू व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सुरु असलेल्या सामाजिक मोहिमेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रारंभी लायन्स क्लबचे अध्यक्ष धनंजय भंडारे यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे सचिव दिलीप कुलकर्णी, खजिनदार नितीन मुनोत, शालेय संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब विधाते, संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजी विधाते, मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, डॉ. अमित बडवे, आनंद बोरा, डॉ.सिमरनकौर वधवा, राजबिरसिंग संधू, सुनिल छाजेड, प्रिया मुनोत, पुरुषोत्तम झंवर, किरण भंडारी, अंजली कुलकर्णी, लिओ क्लबच्या अध्यक्षा आंचल कंत्रोड, हरमन वधवा आदींसह लायन्स, लिओ सदस्यांसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात लता म्हस्के यांनी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय अमोल मेहेत्रे यांनी करुन दिला. भारत मातेच्या वेशभुषेत आलेल्या मुलीने व शाळेच्या मैदानात साकारलेल्या भारताचा नकाशा असलेल्या तिरंगा रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधले.
धनंजय भंडारे म्हणाले की, समाजातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी लायन्स क्लब शिक्षणदूतची भूमिका बजावत आहे. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी लायन्स योगदान देत आहे. श्रमिक, कष्टकरी मुलांना शाळेत लाबून शाळेत येण्यासाठी लायन्सच्या माध्यमातून सायकल उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आजची मुले उद्याच्या सक्षम भारताचे भविष्य असून, सक्षम भारत घडविण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. शिवाजी विधाते यांनी सर्वसामान्य श्रमिक कामगारांच्या मुलांना घडविण्याचे कार्य विधाते विद्यालय करीत आहे. शिक्षणाने सक्षम समाजनिर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश दरवडे यांनी केले. आभार संतोष सुसे यांनी मानले.
