• Wed. Feb 5th, 2025

सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी प्रशांत मुनोत यांची निवड

ByMirror

May 30, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- सोलापूर विभागीय रेल्वेच्या प्रवाश्यांशी निगडीत प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या (सोलापूर विभागीय रेल्वे युझर्स कंन्सल्टेटिव्ह कमिटी) सदस्यपदी घर घर लंगर सेवेचे सेवादार तथा उद्योजक प्रशांत मुनोत यांची निवड करण्यात आली. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र मेकॅनिकल इंजिनीअर्स असोसिएशन च्या मार्फत झाली असून ही निवड सन 2022 ते 2023 अशा दोन वर्षांसाठी राहणार आहे.


या पूर्वी स्थानिक रेल्वे सल्लागार समितीवर मुनोत कार्यरत होते. आतापर्यंत त्यांनी रेल्वेच्या सुविधांबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. त्यात नगरच्या स्टेशनचे सुशोभीकरण, तेथील सोयी-सुविधा, नगरला न थांबणार्‍या गाड्यांना थांबा मिळण्याबाबतचा प्रश्‍न या विषयांवर ते सातत्याने आवाज उठवत आहेत. शिर्डी-नगर-मुंबई फास्ट पॅसेंजरला सात ऐवजी 18 डबे जोडावेत, तसेच नगर ते पुणे दरम्यान इंटरसिटी ट्रेन सुरू व्हावी याकरीता त्यांचा सतत पाठपुरावा करून वेळोवेळी रेल्वेकडे मागणी केली आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यामार्फत नगर पुण्यासाठी इंटरसिटी करीता पाठपुरावा सुरु असून, ही सेवा लवकरच सुरु होऊन सर्वांना फायद्याची ठरणार असल्याचा विश्‍वास मुनोत यांनी व्यक्त केला.


नगर-बीड परळी मार्गाला विलंब झाला आहे. परंतु ते पूर्ण करण्यास सतत पाठपुरावा या समितीच्या बैठकित करण्यात येणार आहे. रेल्वेचे नगरमध्ये हॉस्पिटल नाही. त्यासाठी नगर ते कोपरगाव दरम्यानच्या रेल्वे कर्मचार्‍यांना पुण्याला जावे लागते. नगरमध्ये रेल्वेचे अद्ययावत हॉस्पिटल झाल्यास कर्मचार्‍यांबरोबर प्रवाशांनाही त्याचा लाभ होईल. त्यामुळे असे रुग्णालय नगरला होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल हरजितसिंह वधवा, सुनील छाजेड, विपुल शाह, धनंजय भंडारे, जस्मित वधवा, किशोर मुनोत, संदेश रपारिया, आनंद बोरा, राहुल बजाज यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *