• Thu. Jan 16th, 2025

सामाजिक वनीकरणाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण

ByMirror

Jun 6, 2022

सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची मोहीम प्रत्येकाने हातात घेणे काळाची गरज -वनक्षेत्रपाल दिलीप जिरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची गरज आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, जमिनीची धूप थांबविण्यासाठी तसेच ऑक्सिजन देणार्‍या झाडांची लागवड करून ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून मानवाचे जीवन सुरक्षित करता येणार आहे. औद्योगिकरणामुळे एकीकडे विकास होत आहे, तर दुसरीकडे पर्यावरणाचा र्‍हास होत चालला आहे. पर्यावरण रक्षण म्हणजेच सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची मोहीम प्रत्येकाने हातात घेणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक वनीकरणाचे वनक्षेत्रपाल दिलीप जिरे यांनी केले.


अहमदनगर सामाजिक वनीकरणाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इसळक येथील अनामप्रेम संस्था व रोपवाटिका येथे राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण अभियानाप्रसंगी जिरे बोलत होते. डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे व हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर यांच्या हस्ते रोपे लावून वृक्षरोपण अभियानाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमासाठी वनपाल रवींद्र भोपे, अतुल बोरुडे, वनरक्षक अफसर पठाण, सचिन थोरात, ज्ञानेश्‍वर दहिफळे, वैशाली दराडे, संपत गाडे, अजित कुलकर्णी, अजय शिंदे, अंबादास मोरे, सौरभ गाडे आदी उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, पृथ्वीचे अस्तित्व टिकवण्यासाठी, तिचे सौंदर्य हिरवाईने फुलविण्याची गरज आहे. जंगल तोड झाल्याने पर्यावरणाचे प्रश्‍न निर्माण झाले असून, भविष्याचा विचार करुन वृक्षरोपण व संवर्धन चळवळ काळाची गरज बनले असल्याचे त्यांनी सांगितले. सुरेश खामकर यांनी पर्यावरणाच्या निसर्गचक्रात मनुष्याने अवास्तव हस्तक्षेप केल्याने पर्यावरणाची हानी झाली आहे. यामुळे मानवी जीवनावरही विपरीत परिणाम होत आहे. वसुंधरेच्या संवर्धनेचा वसा वृक्षरोपणाने जपला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *