मार्कंडेय शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या विविध कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना ज्वाजल्य देशभक्तीची प्रेरणा
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगरला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त निघालेल्या प्रभात फेरीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, राणी लक्ष्मीबाई, भारत माता, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, नेताजी सुभाषचंद्र भोस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरु आदी महापुरुषांच्या वेशभुषेत अवतरलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. श्री मार्कंडेय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच बालक मंदिराच्या वतीने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी धनवे व महापालिका शिक्षण विभागाचे शिक्षण समन्वयक अरुण पालवे यांच्या हस्ते प्रभातफेरीचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे संचालक राजेंद्र म्याना, श्रमिक जनता हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष सग्गम, सचिव शंकर येमुल, श्रमिक बालाजी देवस्थानचे अध्यक्ष विनोद म्याना, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत गोरे आदींसह विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.

हातात तिरंगे ध्वज, भारत मातेचा जयघोष व देशभक्तीच्या गीतांनी परिसर देशभक्तीने भारावून गेला होता. लेझीम व झांज पथकाने प्रभात फेरीची रंगत वाढवली. महापुरुषांचे कार्य व स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्यांची माहिती देण्यात आली. शाळेत देशभक्तीवर झालेल्या विविध कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना ज्वाजल्य देशभक्तीसाठी प्रेरित करण्यात आले. शाळेत विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या वक्तृत्व, निबंध, रांगोळी व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
