• Mon. Jan 13th, 2025

शिवजयंती दिनीच पोलीसाने वृध्द शेतकर्‍याला अमानुषपणे बदडले

ByMirror

Feb 21, 2022

दिवाणी वादात पोलीसांनी अमानुषपणे मारहाण केल्याचा वृध्द शेतकर्‍याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- जागेचा दिवाणी वाद न्यायालयात सुरु असताना एका अदखलपात्र तक्रारीवरुन पोलीस निरीक्षक व एका पोलीस कॉन्स्टेबलने मागासवर्गीय वृध्द शेतकर्‍याला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना शिवजयंती (दि.19 फेब्रुवारी) दिनी बेलवंडी पोलीस स्टेशन (ता. श्रीगोंदा) येथे घडली असल्याचा आरोप तक्रारदार शेतकरी बन्सी शिवराम उजागरे यांनी केला आहे. त्यांनी सोमवारी (दि.21 फेब्रुवारी) पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन मारहाण करणार्‍या संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मौजे कोळगाव येथील बन्सी उजागरे (वय 75 वर्षे) शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा व भावकीचा श्रीगोंदा दिवाणी न्यायालयात मिळकतीबाबत वाद सुरू आहे. अशी वस्तुस्थिती असताना विनोद उजागरे यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनला दिलेल्या अर्जावरुन व त्यांच्या वकिलांनी पोलीस स्टेशनला सांगितल्यावरून बेलवंडी पोलिसांनी 19 फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशनला बोलावून घेतले. या दिवाणी प्रकरणात दखल घेण्याचा अधिकार नसताना संबंधित पोलीस अधिकारी व पोलीस कॉन्स्टेबलने अमानुषपणे मारहाण केली. पुढच्या खोलीतून मारत मारत मागच्या खोलीत नेले व त्या ठिकाणी रिमांडचा पट्टा काढून शिवीगाळ केली. तर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी मित्र भरत हटावकर देखील या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असल्याचे त्यांनी निवेदनात म्हंटले आहे.
या मारहाणीमुळे वयोवृध्द असल्याने पोटामध्ये दुखत आहे. पायाला जखम झालेली असून, अंगावर मुक्कामार लागला आहे. या पध्दतीने अमानुषपणे मारहाण करणार्‍या संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारीवर कारवाई करुन न्याय मिळण्याची मागणी बन्सी उजागरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *