• Mon. Dec 1st, 2025

शिक्षकांचा सरकारच्या नावाने शिमगा

ByMirror

Mar 15, 2023

संपाचा दुसरा दिवस

मोटार सायकल रॅली काढून शाळा बंदचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या संपाच्या दुसर्‍या दिवशी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने बुधवारी (दि.15 मार्च) मोटार सायकल रॅली काढून शाळा बंदचे आवाहन करण्यात आले. तर अहमदनगर पंचायत समिती कार्यालया समोर जुन्या पेन्शनसाठी चालढकल करणार्‍या सरकारच्या नावाने शिमगा करण्यात आला.


या आंदोलनात समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष राजेंद्र लांडे, शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल उरमुडे, राज्य कार्याध्यक्ष अन्सार शेख, सुधीर काळे, दत्ता पाटील कुलट, राजेंद्र निमसे, शेखर उंडे, बाळासाहेब पिंपळे, गोवर्धन पांडुळे, राजेंद्र ठोकळ, आबासाहेब लोंढे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास शिंदे, प्रशांत नन्नवरे आदींसह शिक्षक व महिला शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


प्रारंभी सकाळी माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर शिक्षक-शिक्षिका एकत्र जमले होते. जमलेल्या शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करत शहरातून मोटार सायकल रॅली काढली. रॅलीद्वारे शिक्षकांनी ठिकठिकाणी जावून शाळा बंदचे आवाहन केले. शहरातील प्रमुख चौकातून मार्गक्रमण करीत मोटारसायकल रॅलीचे रेल्वे स्थानक जवळील अहमदनगर पंचायत समितीच्या कार्यालयात समारोप झाला. यावेळी प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या भाषणात जुनी पेन्शन व इतर मागण्यांबाबत दुर्लक्ष करणार्‍या सरकारचा तीव्र शब्दात समाचार घेतला.

यावेळी जमलेल्या आंदोलकांनी सरकारच्या नावाने बोंबाबोंब मारुन जोरदार निदर्शने केली. या संपातून माघार घेणारे शिक्षक नेते संभाजी थोरात याचा गद्दार म्हणून सर्व शिक्षकांच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *