• Wed. Mar 26th, 2025

शहरातील दाळमंडईत उन्हाळ्यानिमित्त आर.ओ. फिल्टरची पाणपोई सुरु

ByMirror

Apr 12, 2022

नागरिक, ग्राहक व हमाल बांधवांची भागवली जाणार तहान

स्व. प्रमिलाताई भंडारी व स्व. राहुल पितळे यांच्या स्मरणार्थ पाणपोईचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात दिवसंदिवस वाढती उष्णता व रणरणत्या उन्हात शहरातील दाळमंडई येथे येणारे नागरिक, ग्राहक व हमाल बांधवांची तहान भागविण्यासाठी जय आनंद फाऊंडेशनच्या वतीने श्रीराम मंदिरासमोर आर.ओ. फिल्टरच्या शुध्द पाण्याची पाणपोई सुरु करण्यात आली. या पाणपोईचा शुभारंभ मर्चंट बँकेचे संस्थापक चेअरमन तथा जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांच्या हस्ते झाला. यावेळी मर्चंट बँकेचे चेअरमन आनंदराम मुनोत, हमाल पंचायतचे अध्यक्ष तथा स्थायीचे माजी सभापती अविनाश घुले, मा. नगरसेवक सचिन जाधव, पोपटलाल भंडारी, बाबूशेठ लोढा, किशोर बोरा, कमलेश भंडारी, चंद्रशेखर राणा, अनुज सोनिमंडलेचा, मनोज शेटिया, अजित भंडारी, अनिल लूंकड, राजू भंडारी, राजू डागा, अमोल शिंगी, राजकुमार वर्मा, सुरेश काबरा आदींसह जय आनंद फाउंडेशनचे सर्व सदस्य तसेच व्यापारी व हमाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात जय आनंद फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी यांनी कोरोना काळात अनेक जवळची माणसे दगावली. यामध्ये मातोश्री स्व. प्रमिलाताई भंडारी व जिवलग मित्र स्व. राहुल पितळे यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ ही पाणपोई सुरु करण्यात आली आहे. आईच्या संस्काराने समाजातील गरजू घटकांना मदत करण्याचे कार्य फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु आहे. कोरोनाकाळातही अनेक गरजूंना मदत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हस्तीमलजी मुनोत म्हणाले की, नगरमध्ये पहिल्यांदाच एप्रिल महिन्यातच तापमान 42 अंशाच्या पुढे गेले आहे. अजून मे महिना जायचा आहे. विदर्भाप्रमाणे शहराचा पारा वाढला असून, पाण्यापासून मनुष्य राहू शकत नाही. रणरणत्या उन्हात बाहेर पडणार्या वाटसरुंची तहान भागविण्यासाठी पाणपोईचा आधार शोधत आहे. दाळमंडई सुरु केलेल्या पाणपोईमुळे ग्राहक व हमाल बांधवांची मोठी सोय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अविनाश घुले म्हणाले की, बाजारपेठेत हमाल बांधव रणरणत्या उन्हात काम करत असतात. या पाणपोईमुळे त्यांना शुध्द व थंडगार पाणी मिळणार आहे. पाणीवाटप हे पुण्याचे कार्य असून, जय आनंद फाऊंडेशनने प्रेरणादायी उपक्रम राबविला असल्याचे सांगितले. तसेच कोरोनाच्या संकटाने पैशाला महत्त्व नसून, मनुष्याला एकमेकांना माणुसकीच्या भावनेने आधार देण्याचे शिकवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाणपोईसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल चंद्रशेखर राणा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सचिन जाधव म्हणाले की, जय आनंद फाउंडेशनने नेहमी सामाजिक कार्यात योगदान दिले आहे. दाळमंडई हा गजबजलेला भाग असून, सकाळ ते संध्याकाळपर्यंत पाण्याची गरज भासते. बाहेरून मोठ्या संख्येने लोक येतात, त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार असल्याचे सांगून, फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याला त्यांनी सलाम केला. भंडारी परिवाराने या पाणपोईस संपूर्ण आर्थिक सहकार्य केले आहे. स्व. प्रमिलाताई भंडारी व स्व. राहुल पितळे यांना श्रद्धांजली अर्पण करून उपस्थितांचे आभार किशोर बोरा यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *