• Thu. Jan 16th, 2025

शरद पवार यांच्याविरोधात विकृत लिखाण करणार्‍या प्रवृत्तीचा निषेध

ByMirror

May 15, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्राबरोबरच देशाच्या सामाजिक, राजकीय, औद्योगिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात समाजमनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्यावर समाजातील काही दुष्ट प्रवृत्तींनी समाज माध्यमांचा आधार घेऊन नकारात्मक टीकाटिप्पणी केली असून, या विकृत लिखाण करणार्‍या प्रवृत्तीचा रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाकडून निषेध नोंदविण्यात आला आहे.


समाजजीवनात आपल्या कर्तृत्वाने आदराचे स्थान प्राप्त केलेल्या खासदार पवार यांच्यावर केलेली टीका महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. वास्तविक पाहता विचारांची लढाई विचारांनी करावयाची असते, ही सुसंस्कृतता महाराष्ट्राने गेली अनेक वर्ष जोपासली आहे. मात्र याचा विचार न करता त्यांच्यावर केलेली टीका ही कोणत्याही मराठी माणसाला सहन न होणारी आहे. ही घटना सुसंस्कृत महाराष्ट्राच्या लौकिकाला निश्‍चितच बाधा निर्माण करणारी आहे. अशा प्रकारे टीका करून बदनामीकारक मजकूर समाज माध्यमातून छापणार्‍या प्रवृत्तींना आळा घालणे ही काळाची गरज बनली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


वास्तविक पाहता महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राला शरद पवार यांनी राष्ट्रीय पातळीवर एक वेगळी दिशा देण्याचे कार्य सातत्याने केले आहे. समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय समाजाला एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत असून, त्यांच्यावर अकारण टीका करून समाजातील वातावरण गढूळ करण्याचा काही प्रवृत्ती काम करीत आहे. अशा प्रवृत्तींचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने निषेध करण्यात येत असल्याचे म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *