जनशिक्षण संस्थेचा उपक्रम
महिला आत्मनिर्भर झाल्यास समाजाची प्रगती -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध कौशल्य आत्मसात करुन कुटुंब उभे करण्यास महिला पुढे येत आहे. महिला सक्षमीकरणासाठी जनशिक्षण संस्था जिल्ह्यात मोठे योगदान देत असून, अनेक महिला युवतींनी स्वकर्तृत्वावर आपले व्यवसाय उभे केले आहेत. महिला आत्मनिर्भर झाल्यास समाजाची प्रगती होणार असून, यासाठी त्यांच्यामधील कौशल्य विकसित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (नवी दिल्ली) संचलित शहरातील जनशिक्षण संस्थेत कौशल्य पदवीदान समारंभ कार्यक्रमात विविध प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला व युवतींच्या पदवीदान समारंभा प्रसंगी आमदार जगताप बोलत होते. नेप्ती नाका मार्कंडेय संकुलात जनशिक्षण संस्थेचे चेअरमन राहुल गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. सुधीर तांबे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, प्राचार्य सुनील सुसरे, संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, कौशल्य विकास अधिकारी रवी पंतम, स्वप्निल ठाणगे, कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य कमल पवार, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, अनिल तांदळे, राजेंद्र लांडे, माजी प्राचार्य सुधीर काळे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात बाळासाहेब पवार यांनी शहरात जनशिक्षण संस्था सन 2005 पासून व्यवसायिक प्रशिक्षण देऊन महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम करत आहे. कोरोना काळात अनेकांच्या नोकर्या जाऊन त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. मात्र व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या महिला या वादळात देखील उभ्या राहून त्यांनी अर्थाजन केले. रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे कार्य जनशिक्षण संस्था करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, कौशल्य विकसित होणे, हेच शिक्षणाचे प्रमुख हेतू असावे. शिक्षणाचे अनेक प्रकार असले तरी त्या क्षेत्रात विद्यार्थी कौशल्य विकसित करत असतो. पारंपारिक शिक्षणाला कौशल्यपूर्ण शिक्षणाची जोड मिळाल्यास बेरोजगारीचा प्रश्न मिटणार असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गुंजाळ यांनी भारत प्रगती करत असताना महिला देखील मागे नसून, प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहे. जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य वर्गातील महिलांना सक्षम करण्याचे कार्य केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात प्रशिक्षण पुर्ण केलेल्या महिला व युवतींनी काळा गाऊन, डोक्यावर टोपी परिधान करुन पाहुण्यांच्या हस्ते पदवीचा स्विकार केला. तब्बल साडेचारशेपेक्षा जास्त महिला व युवक-युवतींना विविध व्यावसायिक प्रशिक्षणाची पदवी प्रदान करण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवतींनी व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण करुन जीवनात अर्थार्जन करण्यासाठी संस्थेने एक आत्मविश्वास निर्माण केल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदा शिंदे यांनी केले. आभार शफाकत सय्यद यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व केंद्राच्या प्रशिक्षिकांनी परिश्रम घेतले.