शलाका फाउंडेशनचा उपक्रम
विद्यार्थ्यांनी समूहातून करिअर करण्याचा प्रयत्न करू नये -प्रा. यशोधन सोमाण
अहमदनगर (प्रतिनिधी)- अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये करिअरच्या अनेक संधी आहेत. विद्यार्थ्यांनी समूहातून करिअर करण्याचा प्रयत्न करू नये. या विभागाची परिपूर्ण माहिती घेऊनच शाखा निवडावी आणि पालकांनी विद्यार्थ्यांची आवड ओळखून त्या दिशेने त्यांना मार्गक्रमण करण्यास प्रोत्साहन द्यावे, अन्यथा अनेक अडचणी निर्माण होतात. तर गेलेली वेळ परत येत नसल्याचे प्रतिपादन प्रा. यशोधन सोमाण यांनी केले.
शलाका फाउंडेशनचे किस्टोन स्कूल ऑफ इंजीनियरिंग हडपसर (पुणे) यांच्या वतीने शहरातील माऊली सभागृहात अभियांत्रिकी प्रवेश मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रमुख मार्गदर्शन करताना प्रा. यशोधन सोमाण बोलत होते. या मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. माणिक विधाते, प्रा. सोनाली मुरूमकर, प्रा. प्रभाकर गवांदे, छाया गवांदे, प्रा. प्रमोद ढगे, प्रा. विवेक चौधरी, प्रा. सुरेश जावळे, सुनीता झिंजाड, अजिंक्य बोरकर, सचिन जगताप, गजेंद्र भांडवलकर आदींसह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. सोमाण पुढे म्हणाले की, प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन आणि करिअरच्या वेध घेण्यासाठी आमच्या इन्स्टिट्यूटचा अट्टाहास असतो. या उपक्रमाचा समन्वय साधून दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, किमान एक हजार पन्नास विद्यार्थी विविध नामांकित कंपनीमध्ये कार्यरत असल्याची त्यांनी माहिती दिली.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, विद्यार्थ्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळाल्यास ते ध्येय गाठू शकतात. मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. अभियांत्रिकीच्या शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी उत्सुक असताना खूप स्पर्धा आहे. पण प्रवेश प्रक्रियाबाबत विद्यार्थी पालकांमध्ये संभ्रम असल्याने याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. केदार टाकळकर यांनी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन करून, यामधील विविध शाखांची माहिती दिली. तर विद्यार्थ्यांनी कागदपत्रांबद्दल सतर्क राहिले पाहिजे. संगणकप्रणालीद्वारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना बारकाईने निरीक्षण करावे. सवलतीचा फायदा घेण्याचे त्यांनी सांगितले.