संतांचा सहवास व विचाराने मनुष्याला सुखी जीवनाचा मार्ग सापडतो -ह.भ.प. साध्वी सोनाली कर्पे
अहमदनगर (प्रतिनिधी)- संताच्या विचाराने जीवन बदलते. संतचरित्राने मनुष्याचा उध्दार होतो. संतांचा सहवास व विचाराने मनुष्याला सुखी जीवनाचा मार्ग सापडतो, असे प्रतिपादन ह.भ.प. साध्वी सोनाली दिदी कर्पे (चकलंबा, बीड) यांनी केले.
वाळकी (ता. नगर ) येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त नाथसेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संगीतमय संतचरित्र कथा सप्ताहाचे समारोपीय पुष्प गुंफताना साध्वी कर्पे बोलत होत्या. श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या पुर्वसंध्येला या कथेचा समारोप झाला. यावेळी सामार्जिक कार्यकते विजय भालसिंग यांनी ह.भ.प. साध्वी कर्पे यांचा सत्कार केला. यावेळी माजी जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह महिला मोठ्या संख्येने हजर होत्या.

परमपूज्य सदगुरु देवेंद्र नाथजी व परमपूज्य सदगुरु महेंद्रनाथजी यांच्या कृपाआशिर्वादाने गावात संगीतमय संतचरित्र कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कथेत ह.भ.प. साध्वी सोनाली दिदी कर्पे यांनी संताचे महात्म्य विशद करताना आपल्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त मंदिरासह संपुर्ण गावात आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती.