• Thu. Jan 16th, 2025

लायन्स व लिओ क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात सामाजिक कार्याचा जागर

ByMirror

Aug 2, 2022

लायन्सच्या अध्यक्षपदी सिमरनकौर वधवा व लिओच्या अध्यक्ष पदाची हरमनकौर वधवा यांनी स्विकारली सुत्रे

ईश्‍वर प्राप्तीचा मार्ग समाजसेवा -सुनिता मालपाणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगर आणि नव्याने युवकांसाठी स्थापन झालेल्या लिओ क्लब ऑफ अहमदनगरचा संयुक्त पदग्रहण सोहळा शहरात पार पडला. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लायन्सच्या वरिष्ठ पदाधिकारी सुनिता मालपाणी यांनी लायन्सच्या क्लबच्या नुतन अध्यक्षा सिमरनकौर वधवा, सचिव प्रणिता भंडारी, खजिनदार प्रिया मुनोत तसेच लिओ क्लबच्या अध्यक्षा हरमनकौर वधवा, सचिव अनया बोरा व खजिनदार प्रिशा बजाज यांना पदाच्या जबाबदारीची शपथ दिली.


हॉटेल मेघनंद येथे झालेल्या या पदग्रहण सोहळ्याची सुरुवात आमदार जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. माजी पदाधिकार्‍यांनी नुतन पदाधिकार्‍यांना पदाची सुत्रे प्रदान केली. यावेळी पदग्रहण अधिकारी कमलेश भंडारी, खुशबू माखीजा, रिजन चेअरमन सुनिल साठे, लिओ क्लबचे डिस्ट्रीक्ट चेअरमन रविंद्र गोल्हार, विभाग अध्यक्ष आनंद बोरा, युक्ती देसर्डा, जस्मितसिंग वधवा, अरविंद पारगावकर, विपुल शहा, धनंजय भंडारे, दिलीप कुलकर्णी, विजय कुलकर्णी, संदेश कटारिया, सतीश बजाज, सहेजकौर वधवा, प्रशांत मुनोत, किरण भंडारी, डॉ. संजय असणानी, डॉ. मानसी असणानी, नितीन मुनोत, प्रविण गुलाटी, आशिष बोरावके आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


प्रास्ताविकात सुनील छाजेड यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून मागील वर्षी करण्यात आलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन, कोरोना काळात डॉ. अमित बडवे यांच्या अध्यक्षतेखाली घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, लायन्सने समाजात सेवाभाव रुजवून समाजसेवेचा विचार दिला. कोरोनाशी हिमतीने लढा देत असताना लायन्सचे सदस्य घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून अग्रभागी होते. जगाच्या पाठीवर सामाजिक कार्य करणारी लायन्स या सामाजिक संघटनेने भारत पोलिओमुक्त करण्यासाठी दिलेले योगदान न विसरता येणारे आहे. लायन्समध्ये या वर्षी महिलांना पदाच्या माध्यमातून संधी देण्यात आली आहे. तर युवकांमध्ये समाजसेवेचे संस्कार घडविण्यासाठी लिओ क्लबची झालेली स्थापना कौतुकास्पद आहे. युवकांना समाजाचे प्रश्‍न व दु:ख समजल्यास क्रांतिकारक बदल घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर हे युवक लायनिझम चळवळीचा वारसा पुढे चालविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सुनिता मालपाणी म्हणाल्या की, ईश्‍वर प्राप्तीचा मार्ग समाजसेवा असून, या भावनेने लायन्सचे सदस्य योगदान देत आहे. समाजातील सेवाभावी घटकांना एकत्र करुन वंचितांना आधार देण्याचे कार्य केले जात आहे. प्रत्येकाला आयुष्यात उभे करण्याचे काम महिला करतात. विविध रुपाने त्या प्रेरणा देत असतात. लायन्सच्या माध्यमातून महिला पदाधिकारी सामाजिक योगदान देऊन समाजातील वंचित, दुर्बल घटकांना उभे करुन प्रवाहात आनण्याचे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर लायन्स व लिओच्या पदाधिकार्‍यांना त्यांनी विविध पदाची जबाबदारी समजावून शपथ दिली. रविंद्र गोल्हार यांनी यावेळी नवीन लायन्स व लिओ क्लबच्या सदस्यांना शपथ दिली.


लायन्सच्या नुतन अध्यक्षा सिमरनकौर वधवा यांनी महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला. तर लिओच्या अध्यक्षा हरमनकौर वधवा यांनी युवकांना संघटित करून सामाजिक चळवळीत योगदान दिले जाणार असून, युवकांना दिशा देण्याचे कार्य केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी ग्रुपचे दिवंगत सदस्य केदार बडवे, अश्‍विनी भंडारे व राजश्री मांढरे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया बोरा व अमोरा वधवा यांनी केले. आभार हरजितसिंह वधवा यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *