शिक्षक परिषदेचे शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण 2 मे ते 14 जून दरम्यान घेऊन इतर कोणतेही प्रशिक्षण घेऊ नये, अशी मागणी शिक्षक परिषदच्या वतीने करण्यात आली आहे. शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर व कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
एस.सी.ई.आर.टी. ने वरिष्ठ व निवडश्रेणी च्या प्रशिक्षणासाठी शिक्षकांकडून दोन हजार शुल्क घेतलेले आहे. मात्र अजूनही प्रशिक्षण आयोजित केलेले नाही. याबाबतचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी मंत्रालयात सादर केल्याचे समजते. याबाबत शिक्षकांकडून सतत विचारणा केली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रशिक्षणाची दिनांक घोषित करण्याची गरज आहे.
कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षात शिक्षक आपल्या मूळ गावी तसेच परराज्यात जाऊ शकलेले नाहीत. शैक्षणिक वर्षांमधील व्यस्त शैक्षणिक उपक्रमामुळे व कोविडमुळे अन्यत्र कुठे जाण्याची संधी त्यांना मिळाली नाही. शिक्षकांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी उन्हाळी सुट्टीच शक्य असते. मे व जूनमध्ये शाळा सुरू राहणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत वरिष्ठ व निवडश्रेणीचे ऑनलाईन प्रशिक्षण वगळता अन्य कोणतेही प्रशिक्षण आयोजित करू नये. शालेय वर्ष 2021-22 चे सत्र समाप्ती 1 मे रोजी होईल, अशा स्वरूपाची घोषणा शासन स्तरावरून करावी. त्यामुळे शिक्षकांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी अगोदरच केलेल्या नियोजनाप्रमाणे जाता येणे शक्य होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण आयोजित करावे, 2 मे ते 14 जून 2022 पर्यंत वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण वगळता अन्य कोणतेही प्रशिक्षण आयोजित करण्यात येऊ नये, ऑक्टोंबर 2021 नंतर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना प्रशिक्षणामधून सूट देण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, शिक्षक आमदार गाणार, राज्य महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी, नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, माजी अध्यक्ष बाबासाहेब काळे, माजी आमदार भगवानअप्पा साळुंखे, सुमन हिरे, प्रा.सुनिल पंडित आदी राज्य कार्यकारणी सदस्य प्रयत्नशील आहेत.