• Mon. Jan 27th, 2025

रिपाईचे स्वातंत्र्यदिनी ईडीच्या अन्यायकारक कारवाईविरोधात उपोषण

ByMirror

Aug 11, 2022

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर सुडबुध्दीने झालेल्या ईडी कारवाईचा निषेध

भाजप विरोधात आवाज उठवणार्‍यांना एक तर देशद्रोही नाहीतर भ्रष्टाचारी घोषित केले जात आहे -सुशांत म्हस्के

अहमदनगर (प्रतिनिधी)- विरोधी पक्षांच्या नेत्यांना संपविण्यासाठी सुडबुध्दीने केंद्रातील भाजप सरकार ईडीला हाताशी धरुन अन्यायकारकपणे कारवाई करत असल्याच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने स्वातंत्र्य दिनी (दि.15 ऑगस्ट) शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी दिला आहे. तर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर सुडबुध्दीने झालेल्या ईडीच्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.


देशात महागाई, बेरोजगारी, जातीयवादामुळे सर्वत्र नागरिक त्रस्त झालेले आहे. या गंभीर विषयावर कोणी आवाज उठवला, तर त्यांच्या मागे ईडी सारखी शासकीय चौकशी लावण्याचे कारस्थान केंद्रातील सरकार करत आहे. या कारवाईतून विरोधकांवर मोठी दहशत निर्माण केली जात आहे. ईडीचा धाक दाखवून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. ईडीची चौकशी भाजप प्रणित आमदार, खासदार यांच्यावर का होत नाही? असा प्रश्‍न रिपाईच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.


नोटबंदीच्या काळामध्ये भाजपच्या प्रमुख नेत्याच्या सहकारी बँकेच्या माध्यमातून कोट्यावधीचा काळा पैसा व्हाईट करुन देण्यात आला. हा पैसा कोठून आला?, भाजप कार्यालयासाठी खर्च केलेले कोट्यावधी रुपये आले कोठून? यावर चौकशी केली जात नाही. पीएम फंडाची इडीमार्फत चौकशी का होत नसल्याचे स्पष्ट करुन ईडीद्वारे विरोधकांचा आवाज दाबून, त्यांना तुरुंगात डांबण्याचे काम हुकूमशाही सरकार करत असल्याचे रिपाईच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


देशात सध्या हुकुमशाही पध्दतीने कारभार सुरु आहे. सोनिया गांधी यांच्यासह सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांना राजकीय द्वेषापोटी मानसिक त्रास देण्याचे काम सुरु आहे. भाजप विरोधात आवाज उठवणार्‍यांना एक तर देशद्रोही नाहीतर भ्रष्टाचारी घोषित केले जात आहे. भाजपला सर्व विरोधी राजकीय पक्ष संपवायचे आहेत. त्यासाठी ईडीचा गैरवापर सातत्याने होत असल्याचे रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष म्हस्के यांनी म्हंटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *