• Wed. Jan 22nd, 2025

रिक्त असलेल्या शिक्षक व लिपिक पदावर तात्काळ नियुक्ती करावी -बाबासाहेब बोडखे

ByMirror

Jul 25, 2022

नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारला शिक्षक परिषदेचे निवेदन

विद्यार्थ्यांचे होत असलेल्या शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी घटनात्मक कर्तव्य जबाबदारी पार पाडण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात रिक्त असलेल्या शिक्षक व लिपिक पदावर तात्काळ नियुक्ती करण्याची व्यवस्था करून, विद्यार्थ्यांचे होत असलेल्या शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी घटनात्मक कर्तव्य जबाबदारी पार पाडण्याची मागणी नव्याने स्थापन झालेल्या सरकारपुढे शिक्षक परिषदेच्या वतीने मांडण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिक्षण सचिव व शिक्षण आयुक्तांना शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.


कोरोनानंतर राज्यात शैक्षणिक सत्र 2022-23 नुकतेच सुरु झाले आहे. राज्याचे अनेक शाळेत रिक्त असलेल्या शिक्षक व लिपिक पदावर नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. रिक्त पदांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शाळेतील शैक्षणिक व प्रशासकीय यंत्रणा बाधित झाली असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांशिवाय शिक्षण होऊ शकत नाही. ही बाब सुद्धा शासनाच्या व प्रशासनाच्या लक्षात येत नाही ही मोठी शोकांतिका आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नूसार बालकांना मोफत व सक्तीचे व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणे ही राज्य शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देणे, शैक्षणिक सत्र सुरू करणे, परंतु शिक्षकाची व लिपिकाची पदे रिक्त ठेवणे ही बाब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून त्यांचे भवितव्य संपुष्टात आणणारी असल्याचे शिक्षक परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


सदर प्रश्‍नाबाबत शासन, प्रशासनाला वेळोवेळी निवेदन व पाठपुरावा करुन देखील याची दखल घेतलेली नाही, ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. रिक्त असलेल्या शिक्षक व लिपिक पदावर तात्काळ नियुक्ती करण्याची व्यवस्था करून, विद्यार्थ्यांचे होत असलेल्या शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी घटनात्मक कर्तव्य जबाबदारी पार पाडण्याची मागणी राज्य सरकारकडे शिक्षक परिषदेने केली आहे. या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, राज्य महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी, नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, माजी अध्यक्ष बाबासाहेब काळे, माजी आमदार भगवानअप्पा साळुंखे, मुंबई विभाग अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, सुमन हिरे, प्रा.सुनिल पंडित आदी राज्य कार्यकारणी सदस्य प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *