वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन, शहर स्वच्छ व हरित करण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरक्षित भारत उपक्रमातंर्गत रविवारी (दि.3 एप्रिल) रस्ता सुरक्षेसाठी मोटारसायकलवर प्रभात फेरी काढण्यात आली. या रॅलीत सहभागी भाऊ व बहिणींनी नागरिकांना अमुल्य जीवनासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन स्वत:चे व इतरांचे जीव वाचविण्याचा संदेश दिला. तसेच शहर स्वच्छ व हरित होण्यास योगदान देण्याचे आवाहन केले.
शिवदर्शन भवन महावीरनगर सावेडी येथून सकाळी 9 वाजता या रॅलीची सुरुवात झाली. नगर ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संचालिका बी.के. राजेश्वरी दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या रॅलीत सुप्रभा बहनजी, उज्वला बहनजी, सोनाली बहनजी, अॅड. निर्मला चौधरी, सिताराम खंडेलवाल, साईनाथ श्रीगादी, दिपक जोध, कॉ. अनंत लोखंडे आदी सहभागी झाले होते. शहरात आयुर्वेद महाविद्यालयात येथे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने स्वागत केले. यावेळी माजी नगरसेवक संभाजी पवार, निखील खामकर उपस्थित होते.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने या रॅलीच्या माध्यमातून अध्यात्मिक प्रचारासह वाहतूक नियमांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. तीन बहनजी व तीन भाईजी यांनी अध्यात्मिक उपदेश केला. प्रा. माणिक विधाते म्हणाले की, स्वत:च्या सुरक्षिततेसह इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. अपघातात एखादा कर्ता पुरुष दगावल्यास तो संसार उघड्यावर येतो. कुटुंबीयांच्या जबाबदारीचे भान ठेवून प्रत्येकाने वाहतूकीचे नियम पाळावे. वाहतूकीचे नियम सुरक्षिततेसाठी असून, निष्काळजीपणाने वाहन चालविल्यास अनेकांना जीव गमवावा लागत आहे. समाजात वाहतूक नियमांबद्दल जागृकता निर्माण होण्यासाठी राबविण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

राजेश्वरी बहन म्हणाल्या की, देशात मोठ्या संख्येने नागरिक अपघातामध्ये मृत्यू पावत आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्याने अपघातामध्ये वाढ होत असून, सुरक्षिततेसाठी वाहतूकीचे नियम पाळण्यासाठी जागृती होणे आवश्यक आहे. या भावनेने शहरात हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. या मोटारसायकल रॅलीचा बोरुडे मळा, प्रेमदान चौक, कुष्ठधाम रोड, श्रीराम चौक, पारिजात चौक, टिव्ही सेंटर, तारकपूर, पत्रकार चौक, सर्जेपुरा, बागडपट्टी, दिल्लीगेट, आयुर्वेद कॉलेज, माणिक चौक, कापड बाजार, नेतासुभाष चौक, दिल्लीगेट मार्गे थेट बालिकाश्रम रोडने मार्गक्रमण होऊन शिवदर्शन भवन येथे समारोप करण्यात आला.