स्वातंत्र्य संग्रामातील महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष
विद्यार्थ्यांचे देशभक्तीवर गीते, भाषणे, नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्ती जागविणाऱ्या विविध कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीवर गीत, भाषणे, नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. स्वातंत्र्य संग्रामातील महापुरुषांच्या वेशभूषेत आलेल्या पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

प्रारंभी संस्थेचे खजिनदार डॉ. खालिद शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे चेअरमन अब्दुल रहीम खोकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष इंजि. इकबाल सय्यद, सचिव विकार काझी, प्राचार्य हारुन खान, उपप्राचार्या फरहाना शेख आदींसह पालक शिक्षक संघाचे सदस्य, पालक, शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. खालिद शेख यांनी बहिरी ससाणा (शाहीन) पक्ष्याचे विविध गुणांची माहिती देऊन यशस्वी जीवनासाठी ते गुण आत्मसात करण्याचे सांगितले. पालकांनी आपल्या मुलांवर बारीक लक्ष ठेवून त्यांना वाईट गोष्टींपासून लांब ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. यासाठी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबध निर्माण करावे. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाकरीता संस्था कटिबध्द असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्राचार्य हारुन खान म्हणाले की, स्वातंत्र्य संग्रामात मुस्लिम क्रांतिकारक व समाजाने दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकून, समाजातील युवकांनी देशासाठी समर्पित भावनेने योगदान देण्याचे आवाहन केले.
बॅण्ड पथकाच्या निनादात विद्यार्थ्यांनी केलेल्या संचलनाने वातावरण प्रफुल्लित झाले होते. विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे उभारुन तिरंगा ध्वज फडकविला. उपस्थित पालक व परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमय्या शेख, सरोज नायर यांनी केले. आभार उपप्राचार्या फरहाना शेख यांनी मानले.
