नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम
योग व आयुर्वेदाचे सिद्धांत शाश्वत -रामचंद्र लोखंडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने मिशन लाईफ अंतर्गत युवक-युवतींसह शालेय विद्यार्थ्यांसाठी योग प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. या निरोगी व सदृढ आरोग्याचा जागर करीत घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण वर्गाला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक रामचंद्र लोखंडे यांनी स्वास्थ्य व निरोगी जीवन जगण्यासाठी योगाचे विविध आसन प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांकडून करुन घेतले. लोखंडे म्हणाले की, आयुर्वेदाप्रमाणे योग-प्राणायाम अथांग सागराप्रमाणे आहे. योग व आयुर्वेदाचे सिद्धांत शाश्वत आहेत. आयुर्वेदाने स्वास्थ्य पुरुषाची व्याख्या सांगितली आहे. तर योग शरीराचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी मदत करतो. आहार हा शरीराची झीज भरून काढून शरीराचे पोषण व संवर्धन करतो. आहार हेच औषध समजून घेण्याबाबतची संकल्पना त्यांनी समजून सांगितली. तर निरोगी आरोग्य व तणावमुक्तीसाठी योग, प्राणायाम व ध्यानधारणेचे महत्त्व विशद केले.

पै. नाना डोंगरे म्हणाले की, योग व प्राणायामाने निरोगी जीवन जगता येते. कोरोनानंतर समाजामध्ये आरोग्यबाबत जागृकता निर्माण झाली असून, युवक-युवती, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक देखील योग वर्गाकडे वळाले आहेत. स्वास्थ्य जीवन जगण्यासाठी योग जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी मल्लखांब प्रशिक्षक गणेश वाळुंजकर, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे आदी उपस्थित होते. हा उपक्रम नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, रमेश गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.