• Fri. Jan 30th, 2026

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाईन प्रणालीच्या अपूर्ण कामाची सहकार मंत्रीकडे तक्रार

ByMirror

Feb 10, 2023

काम अपूर्ण असताना, पूर्ण रक्कम अदा केल्याप्रकरणी सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी वेधले लक्ष

सहकारी संस्था अधिनियमाच्या तरतुदीनुसार तत्कालीन संचालक मंडळ व ठेकेदारावर कारवाईची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटीत ऑनलाईन प्रणालीचे काम अद्याप पर्यंत अपूर्ण असताना संबंधित ठेकेदाराला पूर्ण रक्कम अदा केल्याप्रकरणी संस्थेचे तत्कालीन सत्ताधारी मंडळ व ठेकेदारावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व 1961 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नेते तथा सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी निवेदनाद्वारे सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली.


सहकार मंत्री सावे शहरात आले असता बोडखे यांनी त्यांची भेट घेऊन माध्यमिक शिक्षक सोसायटीत ऑनलाईन प्रणालीच्या कामात झालेल्या अनागोंदीबाबत लक्ष वेधले. यावेळी माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, प्रा. भानुदास बेरड, सुनिल दानवे, बबन शिंदे आदी उपस्थित होते.


संस्थेच्या ऑनलाइन प्रणालीच्या कामासंदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयास वेळोवेळी निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक यांनी सहाय्यक निबंधक शरीफ शेख यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. संस्थेच्या ऑनलाइन प्रणालीच्या कामासंदर्भात सविस्तर चौकशी करून 13 एप्रिल 2022 रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अहवाल सादर केला होता. त्यानुसार 2 मे 2022 रोजी ऑनलाइन कामकाज चौकशी पत्राद्वारे संस्थेला सदर पत्राच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या कालावधीत ऑनलाइन कामकाज रनटाईम सॉफ्टवेअर कंपनीने पूर्ण करावयाची वाढीव मुदत दिली होती. त्यानंतर संस्थेचे अद्याप पर्यंत नऊ महिने संपले तरीही, ऑनलाईन प्रणालीचे कामकाज अपूर्णच असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


याप्रकरणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व 1961 मधील तरतुदीनुसार संबंधित ठेकेदार व काम अपूर्ण असताना पूर्ण झाल्याचे भासवून संपूर्ण रक्कम टप्प्याटप्प्याने सन 2015 पासून 2019 पर्यंत अदा करणार्‍या तत्कालीन सत्ताधारी संचालक मंडळावर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *