कामगारांना आपली हक्क मिळण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर लढा उभारावा लागणार -अॅड. सुधीर टोकेकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- विडी कामगार व घरेलू मोलकरीण महिलांनी वाढती महागाई विरोधात व महिला कामगारांच्या हक्काच्या मागण्यांसाठी संघर्षचा नारा दिला. तोफखाना येथील विडी कामगार संघटनेच्या कार्यालयात आयटक कामगार संघटना, लाल बावटा व इंटक विडी कामगार संघटना आणि मोलकरीण संघटनेच्या वतीने महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व महिलांनी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी आयटकचे जिल्हा सचिव अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, लालबावटा विडी कामगार संघटनेच्या उपाध्यक्षा भारती न्यालपेल्ली, मोलकरीण संघटनेच्या कमलेश सप्रा, इंटकच्या कविता मच्चा, कमलाबाई दोंता आदी उपस्थित होत्या.
प्रारंभी उपस्थित महिलांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार अधिकारी यास्मिन शेख यांना जागतिक महिला दिनानिमित्त विडी कामगार व मोलकरीण महिला कामगारांच्या मागण्यांचे निवेदन दिले. मोलकरीण मंडळला 2022-23 च्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात यावी, हे मंडळ व्यवस्थितपणे कार्यरत करावे, विडी कामगारांना 5 हजार रुपये पेन्शन द्यावी व मजुरीमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महिला दिनाच्या कार्यक्रमात अॅड.कॉ. सुधीर टोकेकर म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्याने महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिला व कामगारांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. कामगार कायद्यात बदल करुन भांडवलदार हिताचे निर्णय केंद्र सरकार घेत आहे. कामगार वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. कोरोना व नंतर महागाईने सर्वसामान्य कामगार वर्गाला जगणे कठिण झाले आहे. महागाई विरोधात व कामगारांना आपली हक्क मिळण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर लढा उभारावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॉ. भारती न्यालपेल्ली यांनी महिला दिन का साजरा केला जातो? याबद्दल सविस्तर माहिती देऊन, महिलांनी आपल्या हक्काविषयी जागरूक राहण्याचे सांगितले. तर अन्याय सहन न करता त्या विरोधात संघर्ष करण्याचे आवाहन केले. यावेळी सगुना श्रीमल, संगीता कोंडा, भाग्यलक्ष्मी गड्डम, पूजा न्यालपेल्ली, रेणुका अंकारम, शारदा बोगा, लिलाबाई भारताल, ईश्वरी सुंकी, शोभा बिमन आदी विडी कामगार महिला उपस्थित होत्या.