अहमदनगर(प्रतिनिधी)- महाराष्ट्र साहित्य परिषद सातारा शाखा आणि सातारा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत अहमदनगरच्या ललिता सुनील कात्रे यांनी खुल्या गटात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. सोशल मीडिया आणि सामाजिक स्वास्थ्य या विषयावरील त्यांच्या निबंधाला बक्षिस देण्यात आले.
नुकताच पारितोषिक वितरण सोहळा कविवर्य बा.सी. मर्ढेकर यांच्या जीवनाचे अभ्यासक विनय हर्डीकर यांच्या हस्ते सातारा येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे ग्रामीण प्रतिनिधी राजन लाखे, पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस, मसाप शहापुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ उपस्थित होते. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल कात्रे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत नगरच्या ललिता कात्रे द्वितीय
