संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर
संघटितपणे संघर्ष करुन व संघर्षाला योग्य दिशा देऊन प्रश्न सोडवून घ्यावे लागणार -एन.एम. पवळे
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका सेवानिवृत्त कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग, पेन्शन विक्री व इतर लाभ मिळण्यासंदर्भात कास्ट्राईब महासंघ संलग्न अहमदनगर महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनची बैठक जिल्हा परिषद येथील कास्ट्राईब महासंघाच्या कार्यालयात पार पडली.
कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तर बैठकीत राज्यातील अनेक महापालिका व नगरपालिका मधील सर्व सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ दिला जात असताना हा लाभ अहमदनगर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना मिळत नाही. तर पेन्शन विक्री देखील महापालिकेकडून दिली जात नाही. हे लाभ मिळण्यासाठी संघटनेच्या वतीने पुढील महिन्यात मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्याचा ठराव घेण्यात आला.

या बैठकीत महापालिका कर्मचाऱ्यांची अडी-अडचणी व प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. महापालिकेतील कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी अपूर्ण असल्याने त्यांना पेन्शन व इतर देयके मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे खातेनिहाय चौकशी संपविण्यासाठी व स्थानिक पातळीवरचे प्रश्न सोडविण्याबाबत मनपा आयुक्तांची भेट घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
एन.एम. पवळे म्हणाले की, महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अनेक ज्वलंत प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे म्हतारपणाचे जीवन खडतर होत चालले आहे. त्यांच्या औषध-उपचाराचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटितपणे संघर्ष करावा लागणार आहे. त्या संघर्षाला योग्य दिशा देऊन प्रश्न सोडवून घ्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीस प्रारंभ करण्यात आले. या बैठकीत नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे अध्यक्ष एन.एम. पवळे, कार्याध्यक्ष डी.यू. देशमुख, उपाध्यक्ष डी.एन. कोंडा, एल.के. जगताप, मधुकर खताळ, सरचिटणीस आर.के. गावडे, सहचिटणीस दिलीप पाठक, रफिक शेख, मुख्य संघटक वसंत थोरात, संघटक वसंत गायकवाड, खजिनदार अन्वर शेख, कार्यकारणी सदस्य साहेबराव बोरडे, इम्तियाज शेख, मंजूर शेख, रामदास वाखारे, अनिस पठाण, भास्कर पेरणे, दिगंबर टेपाळे, सुदाम मोरे, संजू उमाप, शांताबाई शेकटकर, सुशिला शेलार, मुस्ताक शेख. या बैठकीसाठी नूतन पदाधिकारी व सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.