विद्यार्थ्यांनी केला सर्व आजी-माजी शिक्षकांचा सन्मान
गुरुंप्रती आदर व निष्ठा असणारे शिष्य जीवनात यशस्वी -उल्हास दुगड
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये विद्यालयाचे पालक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, ग्रंथपाल व सेवक यांच्या भूमिकेतून एक दिवसाचे शालेय कामकाज पाहिले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सर्व आजी-माजी शिक्षकांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे सेवानिवृत्त अध्यापक प्रफुल्ल गायकवाड तर अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड उपस्थित होते. प्रफुल्ल गायकवाड यांनी स्पर्धामय युगात ज्ञानाची सांगड व्यवहार ज्ञानाशी घालून यशस्वी होण्याचा संदेश दिला.

उल्हास दुगड म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात जाताना विद्यार्थ्यांनी हजर जबाबी असावे. सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतात. आपला विद्यार्थी सर्वोत्कृष्ट घडावा ही त्यांची मनापासून इच्छा असते. गुरुंप्रती आदर व निष्ठा असणारे शिष्य जीवनात यशस्वी होतात. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर यावेळी विद्यार्थ्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावरील कथा सांगण्यात आली.
पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष कैलास दहातोंडे यांनी शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना आपले भवितव्य घडविण्यासाठी अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. आवड असलेल्या कला, क्रीडा, संगीत आदी विविध क्षेत्रात स्वत:ला झोकून त्यामध्ये यश मिळविण्याचे सांगितले. यावेळी पालक शिक्षक संघाचे सदस्य, शाळा समिती सदस्य, आजी-माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. उपमुख्यद्यापिकाची भूमिका पार पाडणारी विद्यार्थिनी अर्पिता निकम हिने आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन कैलास साबळे यांनी केले होते.
