श्री आशितोष महादेव पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान
ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजराने ग्रामस्थ भारावले
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील बुरुडगाव येथून शुक्रवारी (दि.1 जुलै) सकाळी श्री आशितोष महादेव पायी दिंडी श्री क्षेत्र पंढरपूरला आषाढी वारीसाठी पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेचा संदेश देत मार्गस्थ झाली. गावात सकाळी ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजराच्या भक्तीमय वातावरणात डोळे दिपवून टाकणारा अश्वरिंगण सोहळा पार पडला. वैष्णवांच्या मेळ्यातून माऊली… माऊली… च्या गजरात पालखी भोवती धावलेल्या अश्वाने डोळ्यांचे पारणे फेडले.
सकाळी गावाच्या प्रवेशद्वारापासून या दिंडीची सुरुवात झाली. दिंडीची गावातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात प्रदक्षिणा मारण्यात आली. दिंडीच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी घरासमोर सडा-रांगोळ्या टाकण्यात आले होते. दिंडीच्या अग्रभागी शालेय विद्यार्थी भगवे ध्वज व लेझिम घेऊन सहभागी झाले होते. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करणारे झेंडेकरी, टाळकरी, भजनी मंडळी, फुलांनी सजवलेले रथ व डोक्यावर तुळशी, कळस घेतलेल्या महिला दिंडीत सहभागी झाल्या आहेत. दिंडीतील रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

दिंडीचे हे पाचवे वर्ष असून, कोरोनाने तब्बल दोन वर्षाचे खंड पडल्यानंतर यावर्षीच्या दिंडीत तीनशे ते चारशे गावातील वारकरी मोठ्या भक्तीभावाने वारीत सहभागी झाले आहेत. ह.भ.प. लक्ष्मण महाराज शास्त्री, ह.भ.प. योगेश महाराज, ह.भ.प. राहुल महाराज दरंदले, ह.भ.प. दीपक महाराज भवर यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या दिंडी सोहळ्यास शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या दिंडीचे प्रमुख नियोजन प्रा. डॉ. संतोष यादव, जालिंदर तात्या कुलट, किशोर कुलट, राधाकिसन कुलट, शिवाजी मोढवे, बापूसाहेब औताडे, शनी तांबे, फारूक पठाण, नंदू टीमकरे, अक्षय लगड यांनी केले आहे. समस्त ग्रामस्थांनी दिंडी सोहळ्यास वर्गणी देऊन शुभेच्छा दिल्या.
ह.भ.प. लक्ष्मण महाराज शास्त्री यांनी सुखी, समाधानी जीवनासाठी भक्तीमार्ग हा एकमेव पर्याय आहे. जीवनाचा खरा आनंद भक्ती मार्गाने घेता येत असल्याचे त्यांनी सांगितले. संदेश कार्ले यांनी पाऊस चांगला होऊन बळीराजा सुखी व समाधानी होण्यासाठी पांडुरंगचरणी प्रार्थना केली. प्रा. डॉ. संतोष यादव म्हणाले की, महाराष्ट्रातील एक आदर्श व हायटेक दिंडी म्हणून श्री आशितोष महादेव पायी दिंडीची ओळख निर्माण झाली आहे. काळाची गरज बनलेले पर्यावरण संवर्धन व स्वच्छता अभियानात देखील योगदान देण्यात येत असून, वारकर्यांच्या या क्रांतीकारक पाऊलाने बदल घडणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली. दिंडीतील वारकर्यांना उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या तर्फे रेनकोटचे वाटप करण्यात आले. दिंडीत दररोज हरिपाठ, भारुड, किर्तन, वृक्षरोपण व प्रवचनांच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

सामाजिक संदेश देणारी व सर्व सुविधांनीयुक्त हायटेक दिंडी
सामाजिक संदेश घेऊन वारीसाठी निघालेल्या दिंडीतील वारकरी ठिकठिकाणी वृक्षरोपण करुन पर्यावरणाचा संदेश देणार आहेत. तर स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना या दिंडी सोबत महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र्य फिरते स्वच्छता गृहाचा व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दिंडीतील सर्व सहभागी वारकर्यांचा विमा उतरविण्यात आला असून, दिंडी बरोबर रुग्णवाहिका देखील आहे. दिंडीतील रथाभोवती सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असून, गावातील ग्रामस्थ हा सोहळा घरी बसल्या पाहू शकणार आहे.