आठ व बारा वर्षाखालील जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटन
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आठ व बारा वर्षाखालील जिल्ह्यातील खेळाडूंसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन जुने कापड बाजार, नागर महाजन वाडी येथ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व एफएम सुयोग वाघ यांच्या हस्ते पटावर चाल देऊन करण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त पारूनाथ ढोकळे, शाम कांबळे, पंच मनीष जसवाणी, देवेंद्र ढोकळे, डॉ.स्मिता वाघ, सौ अनुराधा बापट आदीसह पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आठ व बारा वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 45 खेळाडू सहभागी झाले होते. पाहुण्यांचे स्वागत विश्वस्त पारुनाथ ढोकळे यांनी केले. महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष व अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, बुद्धिबळ खेळाडूंच्या सरावासाठी प्रशिक्षण व चेस इन स्कूल उपक्रम राबविण्यात येणार आहे. खेळाडूंनी मैदानी खेळाबरोबरच बुद्धिबळासारखे खेळ खेळून आपल्या बुद्धीला चालना द्यावी. नगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू घडवण्याचा संघटनेचा मानस असून, यासाठी पाठबळ राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तामीळनाडू येथील ओकीर्ण या ग्रँडमास्टरला पराभूत करणारा सुयोग वाघ याने खेळाडूंनी चांगल्याप्रकारे बुद्धिबळ खेळ खेळावा. विजय, पराभव सुरु असते. परंतु सर्वात महत्त्वाचे स्पर्धेमध्ये भाग घेणे व पालकांनी आपल्या पाल्याला प्रोत्साहन देऊन त्यांचा खेळ उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच हा सर्बिया देशात झालेली स्पर्धा व तामीळनाडू येथील ओकीर्ण या ग्रँडमास्टरला पराभूत करतानाचे अनुभव कथन केले.
प्रास्ताविकात बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट म्हणाले की, या स्पर्धेतून निवड झालेले दोन मुले व दोन मुली हे पुणे व नागपूर येथे होणार्या स्पर्धेत खेळणार आहे. अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या पुढाकाराने विविध स्पर्धा, खेळाडूंसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येतील व शुक्रवार दि. 22 ते 24 एप्रिल दरम्यान आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धेचे सुध्दा आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घेण्याचे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारूनाथ ढोकळे यांनी केले. आभार खजिनदार सुबोध ठोंबरे यांनी मानले.