नेत्रदान व अवयवदान चळवळ गतीमान होण्यासाठी फिनिक्सचे योगदान -डॉ. गिरीश कुलकर्णी
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेत्रदान व अवयवदान चळवळ गतीमान होण्यासाठी फिनिक्सचे योगदान सुरु आहे. महापुरुषांनी तत्कालीन सामाजिक प्रश्न व वंचित घटकांसाठी कार्य केले. त्यांचा आदर्श ठेऊन आजच्या सामाजिक प्रश्नांवर कार्य करण्याची गरज आहे. मरणोत्तर नेत्रदान, अवयवदान करुन अनेक गरजूंचे जीवन फुलविता येणार असल्याचे प्रतिपादन स्नेहालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सप्ताहनिमित्त नागरदेवळे येथे नेत्रदान व अवयदानची जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कुलकर्णी बोलत होते. महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन अनिल झोडगे, भाजपचे माजी शहराध्यक्ष मिलिंद गंधे, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ जाधव, अय्युब पठाण, राजेंद्र बोरुडे, दिलीप गायकवाड, वसंत कापरे आदी उपस्थित होते.
कुलकर्णी पुढे म्हणाले की, शरीर नष्वर असून, मरताना नेत्रदान करुन अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण होणार आहे. नेत्रदान व अवयवदान चळवळ ही काळाची गरज असून, अनेक दिव्यांग अवयवाच्या प्रतिक्षेत आहे. गैरसमजूतीला थारा न देता नेत्रदान करण्याचे त्यांनी आवाहन केले.
जालिंदर बोरुडे म्हणाले की, फिनिक्स फाऊंडेशनने अनेकांचे मरणोत्तर नेत्रदान घडवून आनले असून, एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण होतो. डोळे कृत्रिमरित्या तयार होत नसून, मरणोत्तर नेत्रदान झाल्यानेच अंधाचे जीवन प्रकाशमान होणार असल्याचे सांगून त्यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचे सांगितले. या जनजागृती उपक्रमासाठी राजेंद्र बोरुडे, सौरभ बोरुडे, ओम बोरुडे, जय बोरुडे, जगदीश बोरुडे, साई धाडगे आदींसह फिनिक्स फाऊंडेशनच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.