फुगड्यांसह रंगला झिम्मा
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी गौरी-गणपतीनिमित्त मंगळगौरी खेळचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिलांनी साधी फुगडी, एका हाताची फुगडी, त्रिफुला फुगडी, चौफुला फुगडी, फुलपाखरू फुगडीसह दोन-तीन प्रकाराचा झिम्मा, तळ्यात-मळ्यात, खुर्ची का मिर्ची, नाच गं घुमा, भोवर भेंडी, अडवळ घूम, पडवळ घूम, गोफ असे मजेदार व प्रसंगी मिश्कील खेळाचा आनंद लुटला.

रंगलेल्या या खेळात सर्व महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. यावेळी दीपा राज, जयश्री पुरोहित, ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, उपाध्यक्षा सविता गांधी, अनिता काळे, दीपा मालू, सुजाता पुजारी, शकुंतला जाधव आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राधिका मंगळागौरी ग्रुपने हा बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण केले होते. या ग्रुपच्या महिला पारंपारिक वेशभुषेत कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी मागील पंचवीस वर्षापासून महिलांसाठी प्रयास ग्रुप कार्य करीत आहे. महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी व त्यांना विरंगुळा मिळावा या भावनेने विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबविले जातात. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी महिलांसाठी दीपा मालू यांनी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळाच्या स्पर्धा घेतल्या. विजेत्या महिलांना दीपा राज यांच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांना कै. तुकाराम गोरे गुरुजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री पुरोहित यांनी केले. आभार सविता गांधी यांनी मानले.