महापुरुषांनी मान, सन्मानाची अपेक्षा न ठेवता समाजाच्या भल्यासाठी कार्य केले -लहू कानडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोककला, कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्रीरामपूर येथे नुकतेच झालेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलनात आमदार लहू कानडे यांच्या हस्ते डोंगरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी संमेलन अध्यक्ष साहित्यिक सुभाष सोनवणे, सभापती तथा कवियत्री वंदनाताई मुरकुटे, स्वागताध्यक्ष सुधाकर ससाणे, शब्दगंध परिषदेचे सुनिल गोसावी, परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पवार, कवी आनंदा साळवे, भाऊसाहेब भोंडगे, राजेंद्र देसाई आदी उपस्थित होते.
आमदार लहू कानडे यांनी महापुरुषांनी मान, सन्मानाची अपेक्षा न ठेवता समाजाच्या भल्यासाठी कार्य केले. त्यांचा आदर्श समोर सामाजिक कार्यकर्त्यांनी निस्वार्थ भावनेने योगदान द्यावे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामधून वंचितांचा आवाज बुलंद केला. समाजात त्यांनी आपल्या साहित्याने क्रांती घडविण्याचे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील सामाजिक कार्यकर्ते पै.नाना डोंगरे शाळेत कार्यरत असून देखील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य सुरु आहे. ग्रामीण भागात वृक्षरोपण, बीजरोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे. डोंगरे यांनी जिल्हा पातळीवर स्त्री जन्माचे स्वागत, वृक्षरोपण, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण जागृती मोहिम व रक्तदान शिबीर व्यापक स्वरुपात राबविल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे बाबासाहेब पवार यांनी सांगितले. पुरस्कार मिळाल्याबद्दल डोंगरे यांच सर्वत्र अभिनंदन होत आहे.