अमृतमहोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
देशभक्तीवर गीते, भाषणे, नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित भारावले
अहमदनगर (प्रतिनिधी)- इकरा एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित पी.ए. इनामदार शाळेत अमृतमहोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्ती जागविणार्या विविध कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. तर सांस्कृतिक कार्यक्रमातून भारत देशाच्या संस्कृतीचे व एकात्मतेचे दर्शन घडविण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमास प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

प्रारंभी संस्थेचे चेअरमन अब्दुल रहीम खोकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी डॉ. खालिद शेख, विकार काझी, इंजी. इकबाल सय्यद, प्राचार्य हारुन खान, उपप्राचार्या फरहाना शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बॅण्ड पथकाच्या निनादात विद्यार्थ्यांनी केलेल्या संचलनाने वातावरण प्रफुल्लित झाले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेले देशभक्तीवर गीते, भाषणे, नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित पालक वर्ग भारावले. महात्मा गांधी, भगतसिंग, मौलाना आझाद, सावित्रीबाई फुले, पं.जवाहरलाल नेहरु, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्लाह खान, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशभुषेत अवतरलेल्या चिमुकल्यांनी कार्यक्रमात स्वातंत्र्य संग्रामातील आठवणींना उजाळा दिला. सिमेवर असलेल्या जवानांच्या जीवनावर आधारित नाटिकेने सर्वांच्या मनात देशभक्ती पेटवली.

अब्दुल रहीम खोकर यांनी देशाला अनेकांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले असून, त्यांच्याबद्दल प्रत्येक भारतीयांना अभिमान व आस्था आहे. तर देश रक्षणासाठी सिमेवर कर्तव्य बजावणार्या जवानांप्रती सर्वजण कृतज्ञ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्राचार्य हारुन खान यांनी आर्थिक, सामाजिक व धार्मिक गुलामगिरीत अडकलेल्या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सन 1857 च्या पहिल्या उठापासून ते 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालेल्या स्वातंत्र्याचा माहितीपट विद्यार्थ्यांसमोर उभा केला. तर मोठ्या संघर्षाने मिळलेल्या भारत देशाच्या विकासासाठी आपले योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशातील ऐतिहासिक वास्तूंचे बनवलेल्या प्रतिकृतीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये लाल किल्ला, कुतुबमिनार, चारमिनार, इंडिया गेटच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमास शालेय विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमय्या शेख, सरोज नायर यांनी केले. आभार मुनझ्झा शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम
घेतले.
